चहाच्या बिझनेसमध्ये रमला अभियंता

अरुण ठोंबरे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

केदारखेडा (जि. जालना) - नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, या ध्येयाने पछाडलेल्या केदारखेड्यातील नारायण विजय कोलते या अभियंत्याने चक्‍क चहाचे दुकानच सुरू केले आहे. विशेष म्हणजे यातून त्याची महिन्याला लाखाची उलाढाल होत आहे. या चहाचे ब्रॅंडिंग करण्याचा त्याचा निर्धार आहे. 

केदारखेडा (जि. जालना) - नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, या ध्येयाने पछाडलेल्या केदारखेड्यातील नारायण विजय कोलते या अभियंत्याने चक्‍क चहाचे दुकानच सुरू केले आहे. विशेष म्हणजे यातून त्याची महिन्याला लाखाची उलाढाल होत आहे. या चहाचे ब्रॅंडिंग करण्याचा त्याचा निर्धार आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील जवखेडा ठोंबरे येथील नारायण कोलते हा शेतकरी कुटुंबातील. घरी सहा एकर शेतजमीन. वर्ष 2013-14 मध्ये सेलू (जि. परभणी) येथून इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा प्रश्‍न होता. त्यामुळे सुरवातीची काही वर्षे नोकरी कर्षीेत काहीसे भांडवल उभे केले. अर्थात, तुटपुंजा भांडवलातून मोठा व्यवसाय सुरू करणे शक्‍यही नव्हते. त्यामुळे चहा विक्री हा सुलभ आणि भविष्यात विस्तार होऊ शकणारा बिझनेस सुरू करावा, असे नारायणच्या मनात आले. आठ ते नऊ महिन्यांपूर्वी केदारखेडा येथील भोकरदन-जालना महामार्गावरील बसस्थानकाजवळ त्याने पार्टनर विसावा हे चहा विक्रीचे दुकान थाटले. सोबत सुशिक्षित भाऊ महेश याचीही मदत घेतली. अर्थात, चहा विक्रीचा व्यवसाय घरातील दुग्धव्यवसायालाही पूरक ठरला. दररोज लागणाऱ्या जवळपास वीस लिटर दुधापैकी काही प्रमाणात इतर पशुपालकांकडून घेतले जाऊ लागले. त्यामुळे त्यांनाही ग्राहकी मिळाली. जवळपास साठ हजार रुपये गुंतवणूक करून केलेला चहा विक्रीच्या व्यवसायात आता दिवसाला किमान चार ते पाच हजार रुपये याप्रमाणे महिन्याला एक लाख रुपयाच्या जवळपास उलाढाल होत आहे. यात खर्च वजा दोन ते अडीच हजार रुपयांचा निव्वळ नफाही होत आहे. परिसरातील चहाप्रेमी ग्रामस्थ; तसेच जालना-भोकरदन महामार्गावरचे लोकेशन असल्याने प्रवासीही चहा पिण्यासाठी येथे येतात. त्यामुळे नियमित ग्राहकी आहे. 

व्हॉट्‌सऍपवर मिळतात ऑर्डर 
चहा पिण्यासाठी ग्राहकाला प्रत्येकवेळी यावे लागू नये म्हणून नारायण यांनी व्हॉट्‌सऍपवर ऑर्डर घेण्याची सोय केली. ही कल्पनाही येथील ग्रामस्थ, परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे बसल्याबसल्या अनेकांच्या चहाच्या ऑर्डर व्हॉट्‌सऍपवर मिळू लागल्या आहेत. 

मेकओव्हरसह करणार ब्रॅंडिंगही 
प्रयोग म्हणून झालेली सुरवात यशस्वी ठरल्यानंतर आता नारायण यांना वेध लागले आहेत, ते चहा विक्रीसाठी थाटलेल्या हॉटेलच्या मेकओव्हरचे. सोबत चहाच्या ब्रॅंडिंगचेही. थोडाबहुत पैसा गाठीशी आल्यानंतर त्यांनी हॉटेलची रचना, त्याचे डिझाईन्स, विशेष कपबशा, लोगो यादृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. महिनाभरात या कामांना गती येईल. यात मिळणारे यश पाहून अन्य ठिकाणीही चहा विक्री व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

कंपनीत नोकरी केली असती तर महिन्याला ठराविक पगार मिळालाही असता; पण तसे न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असे ध्येय होते. अर्थात, भांडवलाचा प्रश्‍न आलाच. त्यामुळे सुरवातीला काहीकाळ कंपन्यांत मिळेल ती नोकरी करून पैसे उभे केले. अर्थात, चहा विक्रीत स्कोप दिसला. शिवाय चहा बनविण्याची आवड लहानपणापासून होतीच, कामी आली. 
नारायण कोलते, 
युवक, केदारखेडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer in Tea Business