कर्जमाफीचा घोळ कायम ; सुधारित ग्रीन लिस्टमध्येही नाव सापडेना

तानाजी जाधवर
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ग्रीन लिस्ट मध्ये तांत्रीक चुका झाल्याचे मान्य केले होते, मात्र त्यामध्ये सुधारणा कऱण्यासाठी खास आयटी विभागाला आदेश दिल्याचे त्यानी सांगितले होते. त्यानुसार नव्या यादीमध्ये त्रुटी दिसणार नाहीत, अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यातील त्रुटीवर विचारच झाल्याचे दिसत नाही. 

उस्मानाबाद : कर्जमाफीमधील त्रुटी दुर करुन यादी जाहीर करु म्हणणाऱ्या सरकारने पुन्हा त्याच चुका केल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले होते, त्यांचा सुधारीत ग्रीन लिस्टमध्ये समावेश नसल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमधुन संताप व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ग्रीन लिस्ट मध्ये तांत्रीक चुका झाल्याचे मान्य केले होते, मात्र त्यामध्ये सुधारणा कऱण्यासाठी खास आयटी विभागाला आदेश दिल्याचे त्यानी सांगितले होते. त्यानुसार नव्या यादीमध्ये त्रुटी दिसणार नाहीत, अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यातील त्रुटीवर विचारच झाल्याचे दिसत नाही. कारण ग्रीन लिस्ट प्रदर्शित करण्यात आली असली तरी ज्यांना कर्जमाफी दिल्याचे प्रमाणपत्र एका समारंभात दिले गेले होते, त्यांची नावेच यादीमध्ये नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पहिल्या ग्रीन लिस्टमध्ये ही त्रुटी 'सकाळ'ने सर्वांच्यासमोर आणली होती, त्यानंतर दोन दिवसामध्ये ही यादीच काढुन टाकण्याची नामुष्की सरकारवर आढोवली होती. त्यानंतर संपुर्ण राज्यामध्ये याबाबत तीव्र संतापाच्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांनीही चुकीची कबुली दिली होती.त्यानंतरही पुन्हा तोच प्रकार घडल्याने आता सरकार खरच कर्जमाफीच्या प्रक्रीयेकडे गांभीर्याने लक्ष देत आहे का ? याविषयी शंका उपस्थित होत आहेत. 

पहिल्या टप्यातील यादीमध्ये इतका गोंधळ निर्माण झाल्याने उर्वरीत प्रक्रीयेबाबतसुध्दा आता शेतकऱ्यांना चिंता वाटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँकेतील कर्ज खात्यावर एकही रुपया अजून तरी आलेला नसल्याचे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील यानी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. शिवाय प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाला दिलेली असून त्यांच्या स्तरावरील ही प्रक्रीया असून त्याविषयी सहकार विभागाचे अधिकारीच सांगु शकतील अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. याबाबत जिल्हा उपनिबंधक विकास जगदाळे यांना संपर्क साधला असता अजुन तरी नावे आली नाहित पण लवकरच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: esakal news maharashtra farmers loan waiver scheme issue