हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व मान्यता समिती स्थापन

राजेश दारव्हेकर
Thursday, 29 October 2020

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मान्यतेने हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

हिंगोली : एक पालकत्व अनाथ, आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या मूलांना कुटुंबाचा आधार मिळावा. वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे संगोपन कुटुंबात व्हावे. यासाठी प्रतिपालक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मान्यतेने हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

या समितीमध्ये बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. विक्रम काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, (धान फाऊंडेशन) स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधी अक्षय पतंगे, (साथ फाऊंडेशन) स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधी श्रीमती मिराबाई गणगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याद्वारे नाम निर्देशित प्रतिनिधी  यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर या समितीच्या सदस्य सचिवपदी संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जबीरखान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा प्रवेश रद्द झाल्याने पालकांचा जीव टांगणीला, ‘आरटीई’च्या नवीन नियमावलीचा परिणाम; गुरुवारी शेवटचा राऊंड -

मुलांना दत्तक घेण्यासाठी योजना आहे

आपल्या मुलांसोबत गरजू मुलांना सांभाळ करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. मुलांना दत्तक घेण्यासाठी योजना आहे. मात्र दत्तक घेणारे शक्यतो लहान मुलांनाच दत्तक घेणे पसंत करतात. वयाची सहा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना नाईलाजास्तव बालगृहातच वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत राहावे लागते.

कुटूंब हा बालकांचा हक्क असल्याचे मान्य करण्यात आले आहे

राष्ट्रीय बाल धोरणानुसार बालकांचे संगोपन कुटुंबातच व्हावा याला प्राधान्य देण्यात आले आहे. कुटूंब हा बालकांचा हक्क असल्याचे मान्य करण्यात आले आहे. बाल न्याय अधिनियमातील मार्गदर्शक सूचनांमध्येही बालकांना संस्थेत दाखल करणे, हा अंतिम पर्याय असल्याचे म्हटले आहे. प्रतिपालक योजनेमुळे आता या मुलांनाही मायेचा आधार मिळणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे dwandcdoh@gmail.comdwandcdoh@yahoo.co.inhingolidcpu1@gmail.com  या ई-मेल पत्यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.  

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Patronage and Sponsorship Recognition Committee for Hingoli District hingoli news