प्रवेश रद्द झाल्याने पालकांचा जीव टांगणीला, ‘आरटीई’च्या नवीन नियमावलीचा परिणाम; गुरुवारी शेवटचा राऊंड 

शिवचरण वावळे
Thursday, 29 October 2020

लॉकडाउन झाल्यामुळे शिक्षण विभागाच्या नवीन नियमावलीचे पत्र उशीराने प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने देखील नवीन नियमावलीनुसार झालेल्या प्रवेशाची पुन्हा तपासणी केली असता भाडे कराराच्या नवीन नियमात न बसणारे प्रवेश रद्द करावे लागले आहेत. 

नांदेड - जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये ‘आरटीई’तंर्गत २५ टक्के जागा एससी, एसटी, अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागास प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला होता. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून घरभाडे नियमावलीत बदल सुचविल्याने शिक्षण विभागाने शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत. गुरूवारी (ता. २९) प्रवेशाची अंतिम तारिख असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

‘आरटीई’तंर्गत जिल्ह्यातील २४६ शाळांमध्ये तीन हजार २५२ जागेवर हा प्रवेश दिला जातो. यासाठीची ता. १७ मार्चपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरु झाली. ता. २० मार्चला पहिली सोडत पार पडली. तीन हजार २५२ जागेसाठी नऊ हजार ६५९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार पहिल्या फेरीत एक हजार ७८७ जागेवर प्रवेश देण्यात आले होते. पहिल्या फेरीनंतर एक हजार ४६५ जागा रिक्त होत्या. दुसऱ्या फेरीत एक हजार २५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, शिक्षण विभागाकडून भाडेकरुच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा- गो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ​

प्रवेश रद्द करावे लागले 

या दरम्यान लॉकडाउन झाल्यामुळे शिक्षण विभागाच्या नवीन नियमावलीचे पत्र उशीराने प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने देखील नवीन नियमावलीनुसार झालेल्या प्रवेशाची पुन्हा तपासणी केली असता भाडे कराराच्या नवीन नियमात न बसणारे प्रवेश रद्द करावे लागले आहेत. ‘आरटीई’तंर्गत तालुक्यातील विद्यार्थ्यांचे खासगी शाळेत प्रवेश निश्‍चित झाले होते.

हेही वाचले पाहिजे- कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत ​

पालकांना दिलासा मिळणार का?

मात्र ‘आरटीई’च्या नवीन नियमावलीमुळे तालुक्यातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. शिक्षण विभागाने या विषयी शासनाला लेखी पत्र पाठवून कळविले आहे. मात्र, अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे ‘आरटीई’तंर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना दिलासा मिळणार की शाळेचे पूर्ण शुल्क भरावे लागणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

महापालिका क्षेत्रातील स्थिती 

एकुण शाळा - ४० 
प्रवेशास विद्यार्थी पात्र - ६७३ 
प्रवेश पूर्ण - ३०८ 
प्रवेश बाकी - ३६५ 

नांदेड ग्रामीण क्षेत्राची स्थिती 

एकूण शाळा - ४३ 
प्रवेशास विद्यार्थी पात्र - ४४२ 
प्रवेश पूर्ण - १८६ 
प्रवेश बाकी - २५६ 

शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा

ता. २१ सप्टेंबरला शिक्षण विभागाचे पत्र मिळाल्यानंतर भाडे करारनामा हा प्रवेश फार्म भरण्यापूर्वीचा असल्याशिवाय तो ग्राह्य धरला जाणार नाही. २१५ प्रवेश झाले असताना देखील नवीन नियमावलीमुळे प्रवेश रद्द करावे लागले. शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अप्पर सचिव यांच्या मार्गदर्शन मागवले आहे. त्या पत्राचे उत्तर मिळेपर्यंत काहीच करता येणार नाही. त्याची प्रतिक्षा आहे. 
- रुस्तुम आडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नांदेड. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The effect of the new RTE regulations on hanging parents' lives due to cancellation of admission; The last round on Thursday Nanded News