आरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

धनगर समाजातील सर्व संस्था, संघटना, पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या वतीने राज्यभर दोन टप्प्यात अांदोलन केले जाणार आहे. पहिले आंदोलन धगनरी वेशभूषेत अाणि संस्कृतीचे दर्शन घडवत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर २७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

लातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याबाबत या सरकारने सतत टाळाटाळ केली. वेळकाढूपणा केला. सरकारचे हे धोरण आता आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे ‘आरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा’ अशी घोषणा करत आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा धनगर समाजातील बांधवांनी सोमवारी येथे दिला.

धनगर समाजातील सर्व संस्था, संघटना, पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या वतीने राज्यभर दोन टप्प्यात अांदोलन केले जाणार आहे. पहिले आंदोलन धगनरी वेशभूषेत अाणि संस्कृतीचे दर्शन घडवत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर दुसरा टप्पा म्हणजे परभणीत आयोजिण्यात अालेला धनगर समाजाचा महामेळावा. तो ३० सप्टेबर रोजी हाेणार आहे, अशी घोषणा आमदार रामराव वडकूते आणि गणेश हाके यांनी पत्रकार परिषदेत केली. 

वडकूते म्हणाले, ‘‘पक्ष, संघटनांचे झेंडे बाजूला ठेऊन आम्ही एकत्र आलो अाहोत. आरक्षणाचा प्रश्‍न लवकर निकाली लागावा हीच आमची सर्वांची मागणी आहे. आता अााम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सतत प्रश्‍न विचारत राहू. सरकारने आरक्षणाचे आश्‍वासन दिले होते. पण ते पाळले नाही. त्यामुळे धनगर समाजाच्या मनात सरकारने विश्‍वासघात केल्याची भावना आहे. आरक्षण दिले नाही तर  हा समाज सरकारची खूर्ची रिकामी केल्याशिवाय राहणार नाही.’’ समितीतर्फे २७ तारखेला होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथे बैठका घेण्यात अाल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी लहूजी शेवाळे, विठ्ठल रबदडे, सुरेश भुमरे, माधवराव कोळगावे, हरिभाऊ काळे, ज्योती भाकरे, अजित खंदारे, ओमप्रकाश नंदगावे, रमेश पाटील, राम माने, गौरव मदने, माधव साळुंखे आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Establishment of reservation implementation committee By Dhangar Cmmunity