मोफत तांदुळ योजनेतुन एपील शेतकरी कुटूंब वगळले

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. यातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुंटूब कार्डधारक सदस्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला

नांदेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कार्डधारक कुंटूबातील २१ लाख ५२ हजार ५४७ सदस्यांना दहा हजार ७६२ मेट्रीक टन तांदळाचे वाटप आगामी दहा एप्रील पासुन सुरु करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा विभाग करत आहे. यासाठी लागणार तांदुळ जिल्ह्याला प्राप्त झाल्याने तो तालुकास्तरावर पोहचविण्यात येत आहे. परंतु यातुन एपीएल शेतकरी कुंटूबांना वगळण्यात आल्याने आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना
कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. यातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुंटूब कार्डधारक सदस्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. या बाबत जिल्हा प्रशासनस्तरावर पुरवठा विभागाच्या माध्यमातून दहा तारखेपासुन वाटपाबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.  

हेही वाचा.....‘स्वारातीम’ विद्यापीठात लवकरच ‘कोरोना प्रयोगशाळा’

२१ लाख ५२ हजार लाभार्थी
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना म्हणजेच प्राधान्य कुटुंब (केशरी कार्ड) व अंत्योदय योजनेतील लाभार्थींना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमहिना पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. 

हेही वाचलेच पाहिजे....‘त्या’ विदेशी १२ तबलीगीवर गुन्हा दाखल

तीन महिन्याकरीता मिळणार तांदुळ
मोफत तांदूळ एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांकरिता देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारक ७५ हजार ७८४ आहेत. यात सदस्य संख्या तीन लाख १९ हजार ४११ एवढी आहे. तर प्राधान्य कुंटूब कार्डधारक संख्या तीन ९७ हजार ४४५ एवढी आहे. तर यातील सदस्य १८ लाख ३३ हजार १३६ आहेत. अंत्योदय व प्राधान्य कुंटूब कार्डधारक चार लाख ७३ हजार २२९ एवढी तर या दोन्ही कार्डधारकांची सदस्य संख्या २१ लाख ५२ हजार ५४७ आहे.
 
दहा हजार ७६२ टन लागणार तांदुळ

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील केशरी कार्डधारक तसेच अंत्योदय कार्डधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. हा तांदूळ नियमित मिळणाऱ्या धान्याच्या अतिरिक्त आहे. अंत्योदय कार्डधारक सदस्यांना १५ हजार ९७१ क्विंटल तांदुळ लागेल तर प्राधान्य कुंटूब कार्डधारकांना ९१ हजार ६५६ क्विंटल तांदळाची आवश्यकता आहे. या दोन्ही कार्डधारकांच्या सदस्यांना एक लाख सात हजार ६२७ क्विंटल म्हणजेच दहा हजार ७६२ टन प्रति महिना तांदुळ लागणार आहे.  

आत्मत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटूंब वगळले
केंद्र शासनाने काेरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्यानंतर २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. यात अंत्योदय व प्राधान्य कुंटूब कार्डधारक सदस्यांना मोफत पाच किलो तांदुळ देण्याचा निर्णय घेतला. परंतु यातुन नांदेडसह राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील एपील कार्डधारक शेतकऱ्यांना वगळ्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अंत्योदय व प्राधान्य कार्डधारकांना नियमीत धान्य वाटपात दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्यात येतो. यात तांदूळ प्रति तीन रुपये किलो व गहू प्रतिकिलो दोन रुपये दराने मिळतो. ही सुविधा या कार्डधारकांना असताना पुन्हा त्यांना मोफत तांदुळ देतांना शेतकऱ्यांना विसरल्याने शेतकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excluded from the free rice scheme, the APL farmer family, nanded news