esakal | अतिरिक्त पदभाराने अधिकाऱ्यांची कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात सहा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये असून यात हिंगोली, आखाडा बाळापूर, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत व सेनगाव येथील कार्यालयाचा समावेश आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी चार पदे रिक्त आहेत.

अतिरिक्त पदभाराने अधिकाऱ्यांची कसरत

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची चार पदे मागील काही वर्षांपासून अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे कामकाज प्रभारीवर चालत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पदाच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या चालविल्या जातात. यामधून एक हजार पेक्षा अधिक सेविका, मदतनीस यांच्याकडून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, दंड घेर, वजन, लसीकरण आदी कामे केली जातात. 

हेही वाचागंभीर प्रकरण, पोलिस उपनिरीक्षकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना चुकीची वागणुक -

अंगणवाडीमार्फत विविध उपक्रम

सेविका व मदतनीस यांच्यावर लक्ष ठेवून कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मुख्यसेविकांवर असते. तसेच स्तनदा माता, किशोरवयीन मुली, गरोदर माता यांच्या आहार, पोषण आहार, तपासणी आदी कामाचा आढावा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. 

चार पदे रिक्तच 

जिल्ह्यात सहा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये असून यात हिंगोली, आखाडा बाळापूर, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत व सेनगाव येथील कार्यालयाचा समावेश आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर आहेत. मात्र, केवळ हिंगोली, औंढा वगळता इतर ठिकाणची चार पदे रिक्तच आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील कामे पाहताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दुहेरी भूमिका बजावावी लागतेय

हिंगोली ग्रामीण एकात्मिक प्रकल्प अधिकारीपदाचा पदभार गणेश वाघ यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांची बदली औरंगाबाद येथे झाल्याने जागा रिक्त आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून गणेश वाघ यांना दुहेरी भूमिका बजावत तारेवरची कसरत करावी लागत आहे.

येथे क्लिक करातेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक जाळ्यात -

दोन प्रकल्पाचा पदभार एकाच कर्मचाऱ्यावर

 त्याचबरोबर कळमनुरी, आखाडा बाळापूर येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने राजकुमार धापसे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. श्री. धापसे यांना कळमनुरी, आखाडा बाळापूर प्रकल्पाचा गाडा चालवावा लागत आहे. या शिवाय वसमत येथील पदभार मुख्यसेविका श्री. सारेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रिक्त पदे भरावीत

 सेनगाव येथील पदभारही गणेश वाघ यांच्याकडेच आहे. औंढा येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी म्हणून नैना पाटील काम पाहत आहेत. अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. तसेच इतर कामकाजावर परिणाम होत आहे. याकडे लक्ष देऊन अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.