esakal | आळंदी येथील बंदोबस्ताचा अनुभव पाठीशी- एसपी विजयकुमार मगर
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

 नांदेड जिल्ह्याने कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेली उपाययोजना व नियंत्रण वाखाणण्याजोगे असून, नांदेडकरांनी राबविलेला आळंदी पॅटर्न सर्व महाराष्ट्रात नांदेडनंतर राबविला गेला. 

आळंदी येथील बंदोबस्ताचा अनुभव पाठीशी- एसपी विजयकुमार मगर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोलिस दप्तरी संवेदनशिल व तीन राज्यांच्या सिमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्याने कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेली उपाययोजना व नियंत्रण वाखाणण्याजोगे असून, नांदेडकरांनी राबविलेला आळंदी पॅटर्न सर्व महाराष्ट्रात नांदेडनंतर राबविला गेला. आणि त्याचे परिणाम हे सकारात्मक दिसू लागले. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी अत्यंत सखोल पध्दतीने केलेल्या नियोजनाने कोरोना विषाणू प्रादूर्भावाची ६० टक्के लढाई प्रशासनाने जिंकली असल्याचे मत त्यांनी ‘सकाळ’शी बोलतांना व्यक्त केले. 

शनिवार (ता. चार) दुपारची वेळ, सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक बाहेर होते. कार्यालयातच त्यांचे भोजन सुरु असताना भेट घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान पाहून निश्चितच हायसे वाटले. गेली चार आठवडे म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झाल्यापासून ज्या जिद्दीने नांदेड पोलीस काम करत आहेत, त्याला कुठे तरी यश येत असल्याचे दिसून आले.
जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी हातात हात घेवून काम केल्यानंतर काय होते याचा हा प्रत्यय. नांदेड पोलीस दलाने राबविलेला आळंदीचा पॅटर्न साऱ्या महाराष्ट्राने मार्गस्थ केला. अर्थात त्याची अंमलबजावणी केली.

नागमोडी वळणांनी तयार करण्यात आलेली बॅरीकेटींग 

नांदेड शहरातील रस्त्यावरील बॅरीकेटसची सापसिडी संकल्पना ही वाहन धारकांना जवळ येईपर्यंत फसवणारी होती. मात्र या सापसिडी संकल्पनेने शहरातील वाहतूक आणि मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी एक टक्क्यावर आणण्यात पोलीस प्रशासन यशस्वी झाले. याबाबत बोलताना विजयकुमार मगर म्हणाले की, आळंदी येथे वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळी होणारी गर्दी मी अनुभवली. त्यामुळे त्याठिकाणी शहराच्या बाहेर नाकाबंदी आणि गावात नागमोडी वळणांनी तयार करण्यात आलेली बॅरीकेटींग यामुळे गर्दी कमी होऊ शकली. 

हेही वाचादोन हजारांवर महिला बनल्या उद्योजिका, कशामुळे? ते वाचाच

रस्त्यावरील गर्दी आता कमी झाली आहे.

कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा पॅटर्न अंमलात आणण्याचे मी ठरविले आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा नांदेड शहराने हा पॅटर्न राबविला. अभिमान आहे की त्यानंतर अनेक जिल्ह्यांनी याचे अनुकरण केले. दहा किलोमीटरचा फेरा घेवून लोकांना आपले इप्सित स्थळ गाठावे लागत असल्याने लोक रस्त्यावर येण्याचे टाळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी आता कमी झाली आहे.

कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांच्या सिमेवरुन येणारी माणसांची व वाहनांची गर्दी

आंतर राज्य चेक पोस्ट हा आणखी एक विषय. ज्यामुळे तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांच्या सिमेवरुन येणारी माणसांची गर्दी तसेच वाहनांची गर्दी थोपविणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र दोन्ही राज्यांच्या सिमा समन्वयामुळे परराज्यातील मंडळी आपल्याकडे येऊ शकली नाही, व आपली मंडळी तिकडे जावू शकली नाही. यामुळे कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा सर्वात मोठा धोका टळल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील मरकज प्रकरणानंतर आम्ही सतर्क झालो आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील मंडळींनाही आम्ही सतर्क केले. नांदेडात असलेल्या १४ ही संशयितांचे रिपोर्ट आता निगेटीव्ह आले आहेत हे सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.

येथे क्लिक करा -गुरुद्वारा बोर्डातर्फे घरपोच लंगर सेवा

७० टक्के लढाई आम्ही जिंकलो आहोत

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश भोसीकर व आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना व आमच्यामध्ये असलेला समन्वय यामुळे आजपर्यंतची ही लढाई आम्ही जिंकू शकलो. ७० टक्के लढाई आम्ही जिंकलो आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पेट्रोलिंग मोबाईल, शहर वाहतूक शाखेचे नियोजन, ड्रोन कॅमेरा त्याचप्रमाणे होम क्वारंटाईन असलेल्या लोकांवर पाळत ठेवणे यामुळे या आव्हानात्मक कामात आम्हाला सकारात्मकतेतून यश मिळाले. नागरिकांच्या तक्रारीसाठी निर्माण केलेले वेगवेगळे कक्ष, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक, जनजागृती तसेच विक्रेत्यांच्या संदर्भात असलेली हेल्पलाईन, वैद्यकीय सेवा, गरजू व शेतीविषयक तक्रारीसाठी असलेली हेल्पलाईन व कंपनीविषयक तक्रारीसाठी निर्माण केलेले कक्ष यामुळे गोरगरीबांपासून ते गरजूपर्यंत सर्वांना न्याय देता आला. येणारी दहा दिवस तितकेच महत्वाचे असून, या काळातही नागरिकांचे असेच सहकार्य मिळावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले समन्वयाने काम

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे त्यांचे कौतूक आपण स्वतः केले. सॅनिटायझर वाटप, किटकनाशक फवारणी पंप, किटकनाशक औषधी वाटप, हॅटवॉशचे वाटप, पोलीस ठाण्याला विविध वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबविण्यास गेल्या दोन दिवसापासून सुरुवात केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांत समन्वय असणे ही जमेची बाब असली तरी नांदेड शहराचे मनपाचे आयुक्तपद तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पद रिक्त असताना मी व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले समन्वयाने काम हे नांदेडकरांच्या चिरकाल स्मरणात राहील, मात्र गाफिल राहून चालणार नाही, आणखी दहा दिवस आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे, लढाई संपलेली नाही, असा इशाराही मगर यांनी दिला.