जिल्‍हा परिषदेच्‍या बदल्‍यांना 7 जूनपर्यंत मुदतवाढ

मंगेश शेवाळकर
सोमवार, 27 मे 2019

  • राज्‍यात बदल्‍याच्‍या हालचालींना वेग
  • राज्‍यातील जिल्‍हा परिषदा बदल्‍यांनी निघणार ढवळून
  • 'या' कारणाने राबविली नाही जिल्‍हा परिषदांनी बदल्‍यांची प्रक्रिया

हिंगोली : राज्‍यात जिल्‍हा परिषदेच्‍या गट क गट ड संवर्गातील बदल्‍यांना ता. 7 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून यामुळे राज्‍यातील जिल्‍हा परिषदा बदल्‍यांनी ढवळून निघणार आहे.

राज्‍यामध्ये जिल्‍हा परिषदेच्‍या बदल्‍यांची प्रक्रिया साधारणतः ता. 16 मे ते ता. 25 मे या कालावधीत पार पडली जाते. शिक्षक संवर्ग वगळून जिल्‍हा परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्‍या गट क (वर्ग तीन) व वर्ग ड (वर्ग चार) या संवर्गातील बदल्‍या केल्‍या जातात. जिल्‍हास्‍तर व तालुकास्‍तरावर प्रशासकीय व विनंती बदल्‍यांसाठी एप्रिल महिन्यांपासून सुरवात होते. यासाठी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्‍या याद्या तयार करणे, ज्‍येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, याद्यांवरील आक्षेप व दुरुस्‍ती व त्‍यानंतरच समुपदेशन पद्धतीने बदल्‍या केल्‍या जातात. 

यावर्षीही बदल्‍यांच्‍या हालचाली सुरु झाल्‍या होत्‍या. त्‍यासाठी जिल्‍हा परिषदअंतर्गत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्‍या सेवाज्‍येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्‍या होत्‍या. मात्र लोकसभा निवडणुकीच्‍या आचारसंहितेमुळे शासनाने ठरवून दिलेल्‍या ता. 16 मे ते ता. 25 मे या कालावधीमध्ये बदल्‍या करणे अशक्‍य झाले होते. या कालावधीमध्ये बदल्‍या केल्‍यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत असल्‍यामुळे जिल्‍हा परिषदांनी बदल्‍यांची प्रक्रिया राबवली नाही. बदली प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी जिल्‍हा परिषदांनी ग्रामविकास विभागाकडे केली होती. त्‍यानुसार राज्‍याच्‍या ग्रामविकास विभागाने सोमवारी (ता. 27) सर्व जिल्‍हा परिषदांच्‍या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये जिल्‍हा परिषदेच्‍या गट क व गट ड संवर्गातील बदल्‍यांना ता. 7 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. त्‍यामुळे आता जिल्‍हा परिषदेत बदल्‍यांच्‍या हालचालीला वेग आला असून राज्‍यातील जिल्‍हा परिषद बदल्‍यांनी ढवळून निघणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension to Zilla Parishad transfers till 7th June