शाळांचे लवकरच बाह्य मूल्यमापन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

जालना - राज्यातील प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयातील भौतिक सुविधेसह विविध माहितीची शहानिशा करण्यासाठी आता लवकरच शाळांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. मराठवाडा विभागात शाळा सिध्दीनुसार निर्धारकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून शासन आदेश प्राप्त होताच शाळांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

जालना - राज्यातील प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयातील भौतिक सुविधेसह विविध माहितीची शहानिशा करण्यासाठी आता लवकरच शाळांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. मराठवाडा विभागात शाळा सिध्दीनुसार निर्धारकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून शासन आदेश प्राप्त होताच शाळांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शाळा सिध्दीनुसार ऑनलाईन स्वयंमूल्यमापन दहा मार्चपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. प्राथमिक शाळा ते उच्च माध्यमिक विद्यालयात असलेल्या भौतिक सुविधा कोणत्या आणि कशाप्रकारच्या आहेत यासह विविध 16 निकषांनुसार शाळांनी ऑनलाईन माहिती भरली आहे. ही माहिती भरताना अध्ययन, अध्यापन आणि सहशालेय विविध उपक्रम कशाप्रकारे सादर केले जातात यालाही गुणांकन देण्यात आले आहे. तीन महत्वाच्या टप्प्यात माहिती भरताना या माहितीच्या आधारे शाळांना श्रेणी देण्यात येणार आहेत. यात "अ' श्रेणी मिळालेल्या शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यात येणार आहे.

यासाठी औरंगाबाद येथील राज्य शैक्षणिक प्रशासन व नियोजन संस्था (मिपा) मूल्य निर्धारकांना बाह्य मूल्यमापन कशाप्रकारे करावे याबाबत तीन दिवस विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या तुकडीत जालना, औरंगाबाद, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील 74 निर्धारकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निर्धारकांना आदेश प्राप्त होताच शाळांचे बाह्य मूल्यमापन करावे लागणार आहे. यात शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीची सत्यता पडताळणीसह भौतिक सुविधेची प्रत्यक्ष पाहणी निर्धारक करतील. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळा सिध्दीची माहिती भरावी लागणार आहे. श्रेणी जर कमी मिळालेली असेल तर सुधारणा करून पुन्हा माहिती भरावी लागणार आहे. ही प्रक्रिया सातत्याने चालणार आहे. जोपर्यंत शाळांची श्रेणी सुधारत नाही, तोपर्यंत शाळांनी माहिती भरावी लागणार आहे. विभागातील "अ' श्रेणी मिळालेल्या शाळांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

विभागात शाळा सिध्दीनुसार शाळांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. आतापर्यंत 74 निर्धारकांना तीन दिवसाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. विभागातील पाच जिल्ह्यातील उर्वरित निर्धारकांना दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निर्धारक शाळांचे बाह्य मूल्यमापन कशाप्रकारे करावे याबाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली आहे.
- प्रा. जे. एस. बटुळे, प्रशिक्षण प्रमुख, मिपा संस्था, औरंगाबाद.

Web Title: The external evaluation of schools soon