शस्त्रक्रियेविना चिमुकलीच्या घशातील काढले नाणे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

 नरळद (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील घटना;  डॉ. पारस जैन यांच्या प्रयत्नाने साक्षीला मिळाले जीवदान

परभणी : खेळत असताना दोन रुपयांचे नाणे एका चिमुकलीच्या घशात अडकले. परंतु, गंगाखेड येथील डॉ. पारस जैन यांनी त्यांचे शल्यकौशल्य वापरून शस्त्रक्रियेविना घशातील दोन रुपायांचे नाणे अलगद बाहेर काढले. ही घटना शनिवारी (ता. २८) नरळद (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे घडली. डॉ. श्री जैन यांच्या मदतीमुळे चिमुकलीच्या पालकांनी धन्यवाद व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
‘कोरोना’ प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे. परंतु, अशा संकट प्रसंगी जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद आहेत. यामुळे सामान्य रुग्णास फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही डॉक्टरच रुग्णांना सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत, याची प्रचिती शनिवारी  आली.  
 नरळद (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील साक्षी निळे ही मुलगी वडिलांच्या खिशातील नाणे घेऊन एकटीच खेळत होती. ती सदरील नाणे हवेत उंच फेकून हातात पकडायचा खेळ खेळत होती.  हे नाणे तिच्या तोंडातून घशात गेले, हे तिच्या आईने पाहिले. नाणे घशात अडकल्याने तिला श्वास घायला त्रास सुरू झाला. सुरवातीला सर्व घरगुती उपचार केले. परंतु, नाणे घशात अडकलेले निघत नव्हते. यानंतर त्या मुलीस गंगाखेडला घेऊन आले. पण, या ठिकाणी जवळपास सर्वच क्लिनिक आणि छोटे दवाखाने बंद असल्याचे दिसून आले. 

हेही वाचा - गल्लीबोळांतील रस्त्यावर नागरिकांचे जथ्थे

डॉ. पारस जैन यांनी केले उपचार 
ही घटना डॉ. पारस जैन यांना कळल्यावर त्यांनी त्या मुलीवर त्वरित उपचार केले. शल्यकौशल्य वापरून शस्त्रक्रियेविना घशातील दोन रुपायांचे नाणे अलगद बाहेर काढले व मुलीने मोकळा श्वास घेतला. मुलीच्या पालकांनी डॉ. पारस जैन आणि डॉ. श्वेता जैन यांचे तोंडभर कौतुक करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा ...

सायखेडा येथे दारू जप्त
 चारठाणा (जि.परभणी) : सर्वत्र संचारबंदी लागू असूनही चारठाणा व परिसरातील खेड्यांत सरास अवैध दारू विक्री सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा व चारठाणा पोलिसांनी सायखेडा (ता. जिंतूर) येथे शनिवारी (ता. २८) लहू भाऊसाहेब राठोड (वय २७) यांच्या घरावर छापा टाकला. या वेळी विदेशी  दारू, बियरचे बॉक्स जप्त केले. सदरील दारू पाच हजार चारशे रुपये किमतीची असून चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extract coins from the chin in the throat without surgery