बनावट नोटाप्रकरणी दुसरा संशयित जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

औरंगाबाद - नव्या दोन हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटमधील दुसऱ्या संशयिताला सोमवारी (ता. 23) गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. यातील दोघांची "एटीएस'च्या पथकाने चौकशी सुरू केली आहे.

औरंगाबाद - नव्या दोन हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटमधील दुसऱ्या संशयिताला सोमवारी (ता. 23) गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. यातील दोघांची "एटीएस'च्या पथकाने चौकशी सुरू केली आहे.

महंमद इर्शाद (रा. शहाबाजार) याला गुन्हे शाखेने नोटा खपविताना रविवारी अटक केली होती. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता, पथकाच्या हाती काही लागले नाही; मात्र चौकशीतून फेरोज अब्दुल रशीद देशमुख (वय 27) व सय्यद समीर अकबर यांची नावे समोर आली. त्यावरून फेरोज अब्दुल रशीद देशमुख याला पथकाने सोमवारी अटक केली. तो सध्या नारेगाव भागात राहतो. त्याच्याकडून दोन हजारांच्या दोन नोटा जप्त केल्या असून, त्याही बनावटच असल्याचे पोलिसांनी सांगितले. फेरोज व इर्शाद यांची ओळख सेंट्रल नाका येथे एका हॉटेलमध्ये चहा पिताना झाली. बनावट नोटांचा "उद्योग' समजावून सांगत फेरोजने इर्शादला या धंद्यात ओढले. श्रीमंतीची हाव लागलेल्या इर्शादनेही नोटा खपविण्यास सुरवात केली. एक एक करीत त्याने सुमारे दीड लाखाच्या नोटा खपवल्या. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 26 जानेवारीपर्यंत दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी दिली.

"एटीएस'कडून चौकशी
संशयित महंमद इर्शाद व फेरोज देशमुख यांची "एटीएस'च्या दोन सदस्यीय पथकाने चौकशी केली, तासभराच्या चौकशीनंतर पथक माघारी फिरले. या प्रकरणात आणखी संशयितांची माहिती घेतली जात असून, काहीजण पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fake currency case second suspect imprison