लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड, बनावट बियाणे प्रकरण

हरी तुगावकर
Tuesday, 14 July 2020

मनसेच्या चौघांवर गुन्हे

लातूर : ‘महाबीज’सह खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. याप्रश्नी मनसे शेतकरी सेनेचे कार्यकर्ते मंगळवारी (ता. १४) येथील कृषी सहसंचालक कार्यालय मागणीचे निवेदन देण्यास गेले असता, तिथे अधिकारीच उपस्थित नसल्याचे आढळले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी चार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

बनावट बियाणे प्रकरणात शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार घरगुती बियाणे पेरले; पण ते उगवले नाही अशांच्या तक्रारी घ्याव्यात, त्यांनाही भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते येथील कृषी सहसंचालक कार्यालयात गेले; पण संबंधित अधिकारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे हे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी या कृषी सहसंचालक कार्यालयात तोडफोड केली.

हेही वाचा- सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारी ४९ हजार अन् गुन्हे केवळ ४६! खंडपीठात झाली सुनावणी 

पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी; तसेच कृषी विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी संतोष नागरगोजे यांच्यासह चार कार्यकर्त्यांविरुद्ध सार्वजनिक प्रतिबंध अधिनियम ३ व भादंवी ४२७, ३४ नुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.  
 
पाटोदा, चलकांबात पुन्हा गुन्हे 
बीड :
जिल्ह्यातील बहुतांश भागांत सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकार घडले आहेत. कृषी विभागाने न उगवलेल्या बियाणांचे पंचनामे करून गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले आहे. रविवारी (ता. १२) पाटोदा व चकलांबा पोलिस ठाण्यांत नवीन दोन गुन्हे नोंदवले गेले. दरम्यान, बनावट बियाणेप्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत १५ गुन्हे नोंदविले गेले आहेत. 

रविवारी पाटोदा पोलिस ठाण्यात कृषी अधिकारी जयेश भुतपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुस्टर प्लॉट जेनेटिक्स प्रा.लि. या औरंगाबादस्थित बियाणे कंपनीसह व्यवस्थापक गजानन केशव जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. याच दिवशी चकलांबा (ता. गेवराई) पोलिस ठाण्यातही अन्य एका बियाणे कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिरूर कासारचे तालुका कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुजरातमधील वीसनगर येथील संजय सीड्स कॉर्पोरेशन या बियाणे कंपनीविरोधात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, यापूर्वीही केज, अंबाजोगाई, परळी, बीड आदी विविध ठिकाणी असे बोगस बियाणेप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले. 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake seed cases Latur News