गंगाखेड तालुक्यातील माखणी हे मुळगाव असणारा संतोष गोपीनाथ कठाळे हा येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यालय अधीक्षक वर्ग दोन या पदावर कार्यरत होता. राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर नागपूर येथील मानकापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी या गुन्ह्यात आहेत.
परभणी : बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट क्रीडा प्रमाणपत्र सर्रासपणे देणाऱ्या संतोष गोपीनाथ कठाळे यास आज रविवारी (ता. 6 )अटक करण्यात आली. अनेक खेळांची बनावट क्रीडा प्रमाणपत्रे, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या वेगवेगळ्या 17 कार्यालयांचे बनावट शिक्के आणि तब्बल 40 बनावट प्रस्ताव असा धक्कादायक ऐवज या आरोपीच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
गंगाखेड तालुक्यातील माखणी हे मुळगाव असणारा संतोष गोपीनाथ कठाळे हा येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यालय अधीक्षक वर्ग दोन या पदावर कार्यरत होता. राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर नागपूर येथील मानकापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी या गुन्ह्यात आहेत.
हेही वाचा - ६० वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात वार करून खून, कळमनुरी तालुक्यातील झरा येथील घटना
आज पोलिसांनी संतोष गोपीनाथ कठाळे या आरोपीला त्याच्या राहत्या घरून अटक केली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना कठाळे याच्या घरात अनेक बनावट प्रस्ताव, वेगवेगळ्या क्रीडा कार्यालयांचे तब्बल 17 बनावट शिक्के, नोंदी असलेले रजिस्टर्स, प्रमाणपत्रांच्या याद्या, कोरे धनादेश, सह्या केलेले व काही कोरे क्रीडा प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आढळून आली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक लातूर; औरंगाबाद, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अशा अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयांचे बनावट शिक्के यावेळी पोलिसांना आढळून आले आहेत.
दरम्यान या प्रकरणातील आरोपीने किती बनावट क्रीडा प्रमाणपत्रे कोणाकोणाला दिली हा पोलिसांच्या दृष्टीने तपासाचा विषय आहे. यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात दहा आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यात गंगाखेड तालुक्यातील कल्याण मुरकुटे यास अटक करण्यात आली असून त्याला नऊ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.नागपूर सिटीतील मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्ण शिंदे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत. आज त्यांच्यासमवेत संतोष राठोड, राघो चिलगर, मिलिंद नसरे, देवेन्द्र काळे आदी कर्मचारी पोलीस पथकात होते.