नांदेडमध्ये जिल्हापरिषदेसाठी नेत्यांच्या सुना आणि मुलांचीच गर्दी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

नांदेड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. परंतू ही ओळख आता पुसली जात असून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीट वाटप केल्याने घराणेशाहीचा कळस झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

नांदेड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. परंतू ही ओळख आता पुसली जात असून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीट वाटप केल्याने घराणेशाहीचा कळस झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका नेत्याच्या म्हणून गणल्या जातात. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. पूर्वीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करणारे नेतेमंडळी राहिली नाहीत. आता वडील आमदार असतील, तर मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातीलच अन्य सदस्य जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांतून पुन्हा सभापती, अध्यक्ष कसा करता येईल, यावर कटाक्षाने नेतेमंडळी लक्ष देत आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तिकीट वाटप करताना सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी घरातील मंडळींना उमेदवारी देऊ केली आहे. जिल्ह्यात सर्वच पक्षांमधील नेत्यांनी एकमेकांच्या कुटुंबातील सदस्याला विजयी करण्यासाठी केलेल्या अंतर्गत "तडजोडी'आता बाहेर आल्या असून त्याची मतदारांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून डॉ. मीनल खतगावकर यांना रामतीर्थ सर्कलमधून उमेदवारी दिली आहे. याच सर्कलमध्ये राष्ट्रवादीमधून कॉंग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते मोहन पाटील टाकळीकर यांनी त्यांची सून विशाखा पाटील टाकळीकर यांना उमेदवारी दिली आहे.
हदगाव मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मातोश्री शांताबाई निवृत्तीराव पवार जवळगावकर यांना कामारीतून (ता. हिमायतनगर) उमेदवारी दिली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य राजेश पवार यांची पत्नी पूनम पवार यांना मांजरमधून (ता. नायगाव) उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव शिरीष यांना उमरी पंचायत समितीमध्ये सिंधी गणातून उमेदवारी मिळाली असून त्यांना सभापतिपदाची संधी आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर यांची सून मधुमती राजेश कुंटुरकर यांना कुंटुरमधून (ता. नायगाव) उमेदवारी मिळाली आहे. देगलूरचे शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांची सून भाग्यश्री विक्रम साबणे यांना एकलारा (ता. मुखेड) गटामधून संधी मिळाली आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशीला चांडोळा (ता. मुखेड) गटातून लढत आहेत. भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचे पुतणे संतोष यांना जांबमधून (ता. मुखेड) उमेदवारी मिळाली आहे.

कंधार तालुक्‍यातून कॉंग्रेसचे माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर यांची सून वर्षा भोसीकर तर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांची सून संध्या मुक्‍तेश्‍वर बहाद्दपुरामधून (ता. कंधार) एकमेकांविरोधात उभ्या आहेत. लोहा कंधारचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे पुत्र प्रवीण यांना शिराढोण (ता. कंधार), मुलगी प्रणिती यांना वडेपुरीतून (ता. लोहा) तर कौठा (ता. कंधार) गटामधून पुतणे सचिन पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी त्यांचे पुतणे ऍड. विजयकुमार धोंडगे यांना कौठा (ता. कंधार) याच सर्कलमधून उभे केले.

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेते मंडळींनी नात्यागोत्यांसाठी झुकते माप दिल्याचेच दिसून येते. त्यामुळे आता त्याची मतदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. नातेवाइकांना तिकिटे देऊ नका, नात्यागोत्याचे राजकारण करू नका, असे पक्ष आणि त्यांचे श्रेष्ठी सांगत असले तरी नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या नातेवाइकांना तिकीट कसे देता येईल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी काय फिल्डिंग लावता येईल, याचाच विचार केला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Family drama in ZP election