कौटुंबिक अत्याचाराने ११० गर्भवती पीडित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

औरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गेल्या सहा महिन्यांत आलेल्या महिलांपैकी ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याचे समोर आले. ‘व्हायलेन्स अगेन्स्ट वूमन’ या प्रकल्पामुळे या महिलांच्या अत्याचाराला वाचा फोडणे प्रसूतिशास्त्र विभागाला शक्‍य झाले.

औरंगाबाद - घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गेल्या सहा महिन्यांत आलेल्या महिलांपैकी ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याचे समोर आले. ‘व्हायलेन्स अगेन्स्ट वूमन’ या प्रकल्पामुळे या महिलांच्या अत्याचाराला वाचा फोडणे प्रसूतिशास्त्र विभागाला शक्‍य झाले.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), सेहत संस्थेतर्फे कौटुंबिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकल्प घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात सुरू आहे. प्रसूतिशास्त्र विभागात तपासणी आणि उपचारासाठी येणाऱ्या महिलांमधून तब्बल ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याचे या प्रकल्पातून आढळून आले. त्यांना धीर देत अत्याचार कमी होण्यासाठीचे समुपदेशन घाटीच्या स्त्रीरोग विभागाने केले. 

डब्ल्यूएचओकडून जिनिव्हाच्या पथकाने शनिवारी (ता. १९) घाटीला भेट देत या प्रकल्पाचा आढावा घेतला. अत्यंत कमी साधनांत सुरू असलेल्या प्रसूती विभागाच्या गुणवत्तेच्या कामाचे या पथकातील जिनिव्हा येथील डॉ. अवनी अमीन आणि मुंबईच्या सेहत संस्थेच्या डॉ. संजिदा यांनी कौतुक केले. 

याप्रसंगी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. अनिल जोशी, मेट्रन छाया चामले, सहायक मेट्रन कोल्हे, अपघात विभागाच्या इन्चार्ज मुळी आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांचीही पथकाने भेट घेतली.

‘व्हायलेन्स अगेन्स्ट वूमन’ प्रकल्पात औषध वैद्यक व प्रसूती विभागाच्या पन्नासहून अधिक डॉक्‍टरांसह परिचारिकांचे तीन बॅचमध्ये मुंबईत प्रशिक्षण झाले. येथे सर्व स्टाफला हे प्रशिक्षण दिल्याने गरोदर महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याची ओळख, तिचे समुपदेशन, धीर देऊन तिच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती व हक्कांची जाणीव करून देण्याचे काम होत आहे.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, घाटी रुग्णालय

महिलांसाठी टोल फ्री क्रमांक 
कौटुंबिक अत्याचार जेव्हा हिंसेत परिवर्तित होतो. त्यासाठी असणारे कायदे, हक्कांची जाणीव, पोलिसांची मदत, निवारा, सहारा देण्याचे काम या प्रकल्पातून केले जात आहे. प्रसूतिपूर्व तपासणीत दडलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला लक्षणांवरून महिलांना विश्‍वासात घेऊन समुपदेशन केले जात आहे. कौटुंबिक अत्याचार हिंसेत रूपांतरित होत असेल तर त्यासाठी १८० हा टोल फ्री क्रमांक आणि एक सुरक्षा अधिकारीही नियुक्त आहे.

Web Title: Family tortured 110 pregnant plagues