घरी लग्नाची धामधूम सुरू, तिकडे शेतात उभा गहू, मका जळून खाक

दीपक साळुंके
Thursday, 19 March 2020

घरी आलेले पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना पुढे करून शेतकरी हरिदास सपकाळ हे देखील उंडणगावच्या दिशेने जात असताना त्यांना वाटेतच शेतात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली, मात्र, तोपर्यंत वाऱ्यांमुळे आगीने रोद्ररूप धारण केले होते.

भोकरदन (जि. जालना) : एकीकडे घरी लग्नाची धामधूम सुरू असतांना दुसरीकडे अचानक शेतात लागलेल्या आगीत जवळपास चार ते पाच एकर क्षेत्रावर उभा गहू व 40 ते 50 क्विंटल मका जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (ता.19) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

भोकरदन शहरातील न्यू हायस्कूल शाळेजवळील शिवारात हरिदास तुकाराम सपकाळ यांची शेतजमीन आहे. येथे त्यांनी चार ते पाच एकरवर गहू व मकाची लागवड केली होती. दोन तीन दिवसांपूर्वी ते गव्हाची व मकाची काढणी करणार होते. परंतु, त्यांच्या घरी पुतण्याच्या लग्नाची गडबड सुरू असल्याने शेतातील उभ्या मालाची काढणी लग्नानंतर करू असे त्यांनी ठरविले.

आज गुरुवारी हे सगळे वऱ्हाड उंडणगाव (ता.सिल्लोड) येथे लग्नासाठी जाणार होते. घरी आलेले पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना पुढे करून शेतकरी हरिदास सपकाळ हे देखील उंडणगावच्या दिशेने जात असताना त्यांना वाटेतच शेतात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली, मात्र, तोपर्यंत वाऱ्यांमुळे आगीने रोद्ररूप धारण केले होते.

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात  

या घटनेची माहिती नगरसेवक प्रा.रणवीरसिंह देशमुख, बळीराम इंगळे, विकास जाधव, अरुण तळेकर, रंजित जाधव, संतोष सोनवणे यांना मिळाली. त्यांनी लगेच पालिकेचे अग्निशमन बंब पाचारण करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गहू व मका जळून खाक झाली होती. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.  

नेमकी आग लागली कश्याने?

घरातील सर्व मंडळी लग्नाच्या आनंदात असतांना अचानक लागलेल्या आगीने हरिदास सपकाळ यांचे मोठे नुकसान झाले, यापूर्वी खरीप हंगामातही अवकाळी पावसाने मका व कपाशीचे मोठे नुकसान झाले होते.  नेमकी ही आग लागली कश्यामुळे हे स्पष्ट झाले नसले तरी शेतातील रोहित्रातून झालेल्या शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farm In Fire Bhokardan Jalna Aurangabad News