esakal | शेतकऱ्याने टरबूज विक्रीसाठी लढविली अनोखी शक्कल...कोणती ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Potra Tarbuj photo

पोतरा (ता. कळमनुरी) येथील एका शेतकऱ्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती देत थेट शेतातूनच टरबूजाची विक्री सुरू केली आहे. चवदार असलेल्या टरबुजाची चव चाखण्यासाठी गावकरीदेखील त्याच्या मळ्यात खरेदीसाठी येत आहेत. 

शेतकऱ्याने टरबूज विक्रीसाठी लढविली अनोखी शक्कल...कोणती ते वाचा

sakal_logo
By
रघुनाथ मुलगीर

पोतरा (जि. हिंगोली) : लॉकडाउमुळे आठवडे बाजार बंद असून शहर व परिसरात जाणरे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे पोतरा (ता. कळमनुरी) येथील एका शेतकऱ्याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती देत थेट शेतातूनच टरबूजाची विक्री सुरू केली आहे. यातून नफा मिळणार नसला तरी घरखर्च तरी निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पोतरा येथील शेतकरी उमाकांत मुलगीर यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. त्‍यांच्या शेतात दोन विहिरी, बोअरवेल आहे. काही वर्षांपासून टरबूज, काशीफळाची लागवड करून ते शहरात विक्री करतात. विक्रीपासून त्‍यांना चांगला लाभ होतो. या वर्षीदेखील त्‍यांनी रमजान महिना व उन्हाळा यांचा अंदाज पाहून एका एकरात टरबुजाची लागवड केली होती.

हेही वाचाधक्कादायक ब्रेकिंग : मालेगावच्या बंदोबस्ताहून परतलेल्या हिंगोलीच्या सहा जवानांना कोरोना

आठवडे बाजार झाले बंद

 सध्या त्‍यांच्या मळ्यात मोठ्या प्रमाणावर वेलाला टरबूज लागले आहेत. मात्र, महिन्यापासून परिसरातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. तसेच शहरातील बाजार व रस्‍ते बंद आहेत. दुसऱ्या जिल्‍ह्यात जाणाऱ्या सीमा बंद झाल्यामुळे टरबुजाची विक्री कशी करावी, असा प्रश्न त्‍यांच्यासमोर उभा टाकला होता.

टरबुजाची विक्री सुरू

 मात्र, त्‍यांच्या मुलांनी गावात टरबुजाची विक्री करण्याचा सल्‍ला दिला. इतका मोठा माल कसा काय गावात विकावा, असा प्रश्न पडला. मात्र, त्यांच्या मुलांनी व्हॉट्सॲपचा वापर करून टरबूज विक्रीची माहिती दिली. यामुळे शेतात बसून तसेच सोशल डिस्‍टन्सचे पालन करत टरबुजाची विक्री सुरू झाली आहे. चवदार असलेल्या टरबुजाची चव चाखण्यासाठी गावकरीदेखील त्याच्या मळ्यात खरेदीसाठी येत आहेत. यातून लागवडीचाही खर्च निघत नसला तरी घरखर्चासाठी थोडीफार मदत मिळणार आहे.

लागवडीचा खर्च निघाला तरी समाधान

 मागच्या काही वर्षांपासून टरबुजाची लागवड करीत आहे. उन्हाळ्यात त्याला असलेल्या मागणीमुळे आठवडे बाजारासह बाळापूर, वसमत, नांदेड येथे त्‍याची नेहमी विक्री करतो. या वर्षी लॉकडाउनमुळे अडचणी आल्या. मात्र, मुलांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्‍याच्या विक्रीचा सल्‍ला दिला व विक्रीदेखील सुरू झाली आहे. दरवर्षी यातून चांगला नफा मिळतो. मात्र, या वर्षी खर्च निघाला तरी समाधान आहे.
-उमाकांत मुलगीर, शेतकरी

लॉकडाउनचा पपई उत्पादकास फटका


गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील एका शेतकऱ्याने दोन एकरात पपईची लागवड केली आहे. सध्या पपई विक्रीसाठी आली आहे. मात्र, लॉकडाउनमुळे विक्रीच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने जागेवरून तीन रुपये किलोप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

२८ हजार रुपयांची रोपे

गिरगाव येथील शेतकरी शिवाजी खैरे यांच्याकडे असलेल्या जमिनीपैकी त्‍यांनी दोन एकरात पपईची लागवड केली आहे. यासाठी २८ हजार रुपयांची रोपे आणून त्‍याची लागवड केली. त्‍याचे योग्य नियोजन करीत खत, फवारणी, मशागत करून जोपासना केली. यासाठी त्‍यांना एक लाख रुपये खर्च आला. रोपांची चांगली जोपासना केल्याने पपईचांगल्या लगडल्या.

येथे क्लिक करा हिंगोलीत लॉकडाउनमुळे फुलशेती कोमेजली

भाव पाडून खरेदी

 सध्या पपई काढण्यास आली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे व्यापारी पपई खरेदसाठी पुढे येत नसल्याचे चित्र होते. त्यानंतर शेतमाल खरेदीस मिळालेल्या परवानगीमुळे व्यापारी पपई खरेदीसाठी येत आहेत. मात्र भाव पाडून खरेदी करीत आहेत. 

नऊ हजारांच्या पपईची विक्री

जागेवरून तीन रुपये किलोप्रमाणे; तर अर्धापूर येथील व्यापारी तीनशे रुपये क्‍विंटल प्रमाणे पपईची खरेदी करीत आहेत. आतापर्यंत नऊ हजारांच्या पपईची कशीतरी विक्री झाली असल्याचे श्री. शिवाजी खैरे यांनी सांगितले. यासाठी मात्र खर्चच अधिक झाला. यातून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचेही ते म्हणाले.