Farmar : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडणारे वाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

Farmar : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडणारे वाण

वाशी : येथील प्रगतशील शेतकरी तथा सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी गोविंदराव पवार यांनी शेतात लागवड केलेल्या व्हीएसआय १८१२१ या उसाच्या नविन सुधारित वाणाच्या प्लॉटला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्रज्ञ डॉ. रमेश हाफसे यांनी नुकतीच भेट देऊन उसाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने डॉ. हाफसे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. रेपाळे, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत पवार, शिवाजी नाईकवाडी, उद्योजक सतीश जगताप, दत्तात्रेय येताळ, बाळासाहेब उंदरे, दत्तात्रेय पवार,किरण पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

श्री पवार यांनी सांगितले की माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी उसाचे नवनवीन वाण विकसित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर संस्थेचे शास्रज्ञ डॉ. रमेश हाफसे यांनी ८६०३२ व ८२०१ या वाणाच्या संक्रमणापासून व्हीएसआय १८१२१ हे नवीन वाण विकसित केले असून या नविन उसाच्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्ननात मोठी भर पडणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हे वाण विकसित केल्यानतंर काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर बियाणे देऊन उसाची लागवड केली असून संपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानुसार मी डिसेंबर २०२१ मध्ये या उसाची लागवड केलेली असून सद्य परिस्थितीत हा ऊस २२ ते २५ कांड्यावर असुन एका उसाचे वजन तीन ते चार किलो आहे. यानुसार १२ ते १३ महिन्यात हा ऊस परिपक्व होऊन एकरी जवळपास १०० ते १२५ टन उसाचे वजन शेतक-यांना मिळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

दाळिंब, मिरचीवरही प्रयोग

श्री पवार यांनी या पूर्वीही शेतात दाळिंब, मिरची, कांदा, यासह उसाच्या नवनवीन जातींची लागवड करून नवनवीन प्रयोग केलेले आहेत. मागील काळात लागवड केलेले दाळिंब त्यांनी होलंड (जपान) येथे तर ४८८४ ही लागवड केलेली मिरची लंडनमध्ये निर्यात केली होती. त्यांनी लागवड केलेल्या मिरचीच्या प्लॉटला शरद पवार यांनी भेट देऊन पाहणी केली होती.