अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

गोकुंदा (नांदेड) : उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर पाण्याचे जंगली स्त्रोत कमी झाल्याने जंगली श्वापदं आता गावालगतच्या शेतीकडे वळले आहेत. यातूनच अनेक हिंस्र पशूंचे हल्ले वाढले असून याचे ज्वलंत उदाहरण आजच किनवट माहूर रस्त्यावरील शेतात आढळून आले. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किनवट पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कमठाला येथील सतीश अनुरथ सूर्यवंशी (वय 35) हे सोमवारी (ता. 25) सकाळी सव्वासहा वाजता आपल्या शेतात गेले असता दडून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या जोराच्या किंकाळण्याने शेजारच्या शेतातून उमाकांत कऱ्हाळे, सदाशिव भरकड, देवानंद भोयर, भास्कर कऱ्हाळे, नंदकिशोर पतंगे विशाल सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी, यांनी जोराचा आरडा -ओरडा करत हाती मिळेल ते लाकडी दंडुके घेत त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा मात्र तो अस्वल धूम ठोकून जंगलात पळाला.

तातडीने जखमी सतीशला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील संदर्भीय सेवेसाठी नांदेडला जिल्हा रुग्णालयांमध्ये हलवले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीची मदत यावेळी त्यांना दिली. शेजारच्या शेतातील युवक धावल्यानेच नरडीचा घोट घेणारे अस्वल पळाले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer injured in bear s attack