कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 14 जानेवारी 2019

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी (ता. देगलूर) शिवारात नऊ ते बारा जानेवारीच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी मरखेल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी (ता. देगलूर) शिवारात नऊ ते बारा जानेवारीच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी मरखेल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देगलूर तालुक्यातील लोणी येथील शेतकरी बळीराम मारोती चिटावाड (वय 32) यांचा सर्व प्रपंच शेतीवर अवलंबुन आहे. शेतातून मिळालेल्या उत्पन्नातून ते आपला घरगाडा चालवत असत. परंतु मागील काही वर्षापासून सतत लहरी निसर्गाचा फटका त्यांना बसत होता. महागामोलाचे बियाणे ते शेतात टाकत परंतु पावसाचे पाणी नसल्याचे त्यांची शेती नष्ट होत असे. अशातच त्यांनी कर्ज काढले. परंतु शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड ते वेळेत करु शकत नव्हते. तसेच हाताला काम धंदा मिळत नसल्याने ते मागील काही दिवसांपासून बेचैन होते.

अखेर त्यांनी नऊ जानेवारी रोजी रात्री घरातून निघून गेला. सर्वत्र शोध घेतला मात्र तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह लोणी शिवारात एका झाडाला गळफास घेतल्या असवस्थेत सापडला. त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मरखेल पोलिसांनी येऊन पंचनामा केला. सत्यभामाबाई चिटावाड यांच्या माहितीवरुन मरखेल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत.

Web Title: Farmer Suicide In Deglur taluka