कन्येच्या विवाहानंतर शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नांदगाव तालुक्‍यातील घटना, मृत व्यक्ती बीडची

नांदगाव तालुक्‍यातील घटना, मृत व्यक्ती बीडची
नांदगाव (जि. नाशिक) - कन्येच्या विवाहानंतर अवघ्या चोवीस तासांत शेतकरी असलेल्या वधुपित्याने विवाहस्थळाजवळील सातशे मीटरवर असलेल्या झाडाला लग्नातच आहेरामध्ये मिळालेल्या उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वेहेळगाव (ता. नांदगाव) येथे गुरुवारी (ता. 18) पहाटे ही घटना घडली. वडिलांचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे मृत शेतकऱ्याचा मुलगा उमेश खेडकर याने पोलिसांना सांगितले.

बीड जिल्ह्यातील घाटशीळ-पारेगाव (ता. शिरूर) येथील राजेंद्र बाबूराव खेडकर यांची मुलगी चित्रा ऊर्फ कासूबाई हिचा विवाह वेहेळगाव येथील काशिनाथ महादू भाबड यांचे पुत्र साहेबराव यांच्याबरोबर काल (ता. 17) दुपारी वेहेळगाव येथे झाला. वधूच्या मामांच्या घरी आज पहाटे वऱ्हाडी मंडळी गाढ झोपेत असताना वधुपिता राजेंद्र खेडकर घराबाहेर गेले. घरात नसल्याचे कळताच त्यांचा शोध सुरू झाला. दरम्यान, सकाळी संतोष गीते यांना मोबाईल आला. वधूचे मामा रत्नाकर शेरेकर यांच्या घरापासून सातशे मीटरवर असलेल्या शेतातील झाडाला कोणीतरी गळफास घेतल्याची माहिती मिळाली. गीते यांनी पोलिसांना कळविले. गळफास घेतलेली व्यक्ती कालच्या लग्नातील पाहुणा असल्याचे घटनास्थळी पोलिसांना कळले. पोलिसांनी रत्नाकर शेरेकर यांना घटनास्थळी पाचारण केले. मृत व्यक्ती ही मेहुणे राजेंद्र खेडकर असल्याचे त्यांनी सांगितले. नांदगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली.

Web Title: farmer suicide in vehelgav