नापिकी अन् कर्जाच्या ओझ्याने घेतला शेतकऱ्याचा जीव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

वर्षभरापूर्वीच एका मुलीचे लग्न झाले. वाढते कर्ज कसे फेडायचे, हा विचार बाबुराव सोनवळे यांना सतत भेडसावत होता. या घटनेची माहिती समजताच गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजता घडली.

याबाबत माहिती अशी, बाबुराव रामराव सोनवळे (वय 45 रा. देऊळगाव, ता. लोहा) हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततची नापिकी होत होती. खरीप पेरणीसाठी बँकेचे आणि खासगी कर्ज काढून शेती केली, गत तीन वर्षांपासून सततची नापिकी झाली. कोरडवाहू शेती यामुळे कर्ज फेडणे शक्य होत नाही. याशिवाय मुला-मुलींचे शिक्षण व संसार कसा चालवायचा, अशा विवंचनेत असल्याचे सांगण्यात आले.  

वर्षभरापूर्वीच एका मुलीचे लग्न झाले. वाढते कर्ज कसे फेडायचे, हा विचार बाबुराव सोनवळे यांना सतत भेडसावत होता. या घटनेची माहिती समजताच गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी बीएस्सी प्रथम वर्ष मुलगा नववी आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती माळाकोळी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिस जमादार श्री तेलंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनांतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Farmer suicides in Loha nanded district