ई केवायसीचा गुंता -बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेना 

पांडुरंग उगले 
Wednesday, 17 June 2020

खरीप हंगामापूर्वीच बँकेकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठ्याप्रमाणात पीककर्ज वाटप करण्यात येते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने सर्व बंद ठेवून नंतर ठराविक कालावधीतच उघडण्यात येत होत्या. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी मोठा विलंब झालेला आहे.

माजलगाव (जि. बीड) - खरीप पेरणीचा हंगाम सुरू असताना बहुतांश शेतकरी अद्यापही पीककर्जापासून वंचित राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थम्ब सिस्टीमची वेबसाइट शासनाने बंद केल्याने ई-केवायसी करता येत नाही. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकेचे अधिकारी ‘ई-केवायसी’साठी अडून बसले असल्याने मशीनवर ‘अंगठा लागेना अन् पीककर्ज मिळेना’ अशी गत बळीराजाची झाली आहे. 

खरीप हंगामापूर्वीच बँकेकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठ्याप्रमाणात पीककर्ज वाटप करण्यात येते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने सर्व बंद ठेवून नंतर ठराविक कालावधीतच उघडण्यात येत होत्या. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी मोठा विलंब झालेला आहे. यातच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली असून यात अंगठा लावण्यात येणारी ‘थम्ब सिस्टीम’ची वेबसाइट बंद करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यात पीककर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे घेण्याचीही सूट देण्याचे आदेश बँक प्रशासनाला करण्यात आले आहेत.

हेही वाचा - गावरान आंबा बाजारातून गायब, किंमत सर्वसामान्यच्या आवाक्याबाहेर

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांनाही कर्ज देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. असे असताना तिसऱ्या, चौथ्या कर्जमाफी यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बँक प्रशासनाने बंधनकारक केले आहे; परंतु थम्ब सिस्टीम बंद असल्याने मशीनवर अंगठा लागत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. वास्तविक पाहता फेरफार नक्कल, अंगठा लावून होणारी प्रक्रिया, बँक नोड्युज यांसारखी कागदपत्रे न घेण्याचे आदेश बँकेला दिले असताना बँकेकडून मात्र वरील सर्व बाबींची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. एकीकडे ई-केवायसीसाठी बँक अधिकारी अडून बसत असून दुसरीकडे मशीनवर अंगठा लागत नसल्याने अनेक शेतकरी अद्यापही पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यावर जिल्हा प्रशासनानेच उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

पहिल्यांदाच मृग नक्षत्रात पाऊस झाला असल्याने पेरण्या, कपाशी लागवड सुरू आहे. वेळेवर बँकेचे पीककर्ज मिळत नसल्याने काळ्या आईची ओटी भरण्यासाठी खिशात पैसा नसल्याने नाइलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आमचे कर्ज माफ झाले म्हणून नाव आले आहे; परंतु केवायसी बंद असल्याने माफीची पावती निघत नाही. यामुळे बँकेकडून नवीन कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने पेरणीसाठी पैशांची अडचण आली आहे. 
- सुखदेव तौर, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Beed district did not get crop loans