esakal | बियाण्याचे दर जैसे थे; उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना दिलासा

बोलून बातमी शोधा

बियाण्याचे दर जैसे थे; उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना दिलासा

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना बियाण्याचे वेध लागतात. त्यात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

बियाण्याचे दर जैसे थे; उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना दिलासा
sakal_logo
By
सयाजी शेळके :

उस्मानाबाद : सोयाबीन (Soyabeen) बियाण्याचे दर महाबीज कंपनीने गेल्या वर्षीचे यंदाही कायम ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला असून कंपनीचे बियाणे (Seeds) ७५ ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र पुरेशा प्रमाणात बियाण्यांचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. (Farmers have to wait for the seeds before the onset of rains)

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना बियाण्याचे वेध लागतात. त्यात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शिवाय यंदाच्या हंगामात सोयाबीन दराची विक्रमी नोंद केली आहे. सोयाबीन पिकास यंदा ऐतिहासिक भाव मिळाला असून सर्वाधिक आठ हजार रुपयांपर्यंत सोयाबीन विकले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याचे भाव वाढण्याचे संकेत मिळत होते. शेतकऱ्यांनी त्याची तयारीही केली आहे. दरम्यान याबाबत महाबीज कंपनीचे सरव्यवस्थापक अजय कुचे यांनी शनिवारी (ता. एक) याबाबत परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा: दिलासादायक! औरंगाबाद येथील रुग्णसंख्येत आणखी घट

यामध्ये सोयाबीन बियाण्याच्ये दर स्थिर ठेवले असून गेल्या वर्षीच्या दरानेच बियाणे यंदाही शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये जेएस ३३५ या वाणाची किंमत ७५ रुपये किलो असून ३० किलोची बॅग दोन हजार २५० रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे. जेएस ९३०५, एमएएसयु ७१, जेएस ९५६० या वाणाची किंमत ७८ रुपये प्रतिकिलो असून ३० किलोच्या बॅगसाठी दोन हजार ३४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर एमएएसयु- १५८, डीएस- २२८ या वाणांची किंमत ८२ रुपये प्रतिकिलो असून ३० किलोची बॅग दोन हजार ४६० रुपयांना शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागणार आहे.

दक्षता घ्यावी लागणार

दरम्यान गेल्या वर्षी खासगी कंपन्यांनी प्रमाणित बियाणे म्हणून खुल्या बाजारातील सोयाबीनची विक्री केलेले विकल्याचे प्रकार समोर आले आहेत. यंदाही यामध्ये कमी होईल, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः दक्षता घ्यावी लागणार आहे. स्वतःच्या घरातील बियाणे असेल तर त्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी. जरी कंपनीचे बियाणे खरेदी केले तरी त्याची पावती घेऊन सर्व लेबल जवळ ठेवून त्याचीही उगवण क्षमता तपासून पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडूनही केले जात आहे. सोयाबीनचे भाव वाढल्याने पेरणीही वाढण्याची शक्यता असल्याने अनेक कंपन्या बियाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासून पेरणी करणे गरजेचे आहे.

"सोयाबीन बियाण्याचे दर महाबीजने स्थिर ठेवले आहेत. ७५ ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने ३० किलोची बॅग शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापेक्षा जास्तीच्या दराने घेऊ नये. कोणी विक्री करत असेल तर महामंडळाकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार द्यावी.

- बळीराम बिराजदार, सहायक क्षेत्र अधिकारी, महाबीज, उस्मानाबाद.

(Farmers have to wait for the seeds before the onset of rains)