भरदिवसा शेतकऱ्याची घरफोडी, दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

बाबासाहेब गोंटे
Tuesday, 1 September 2020

अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील शेतकरी परमेश्वर भानुदास कान्हे यांची घरफोडी करून चोरट्याने सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील शेतकरी परमेश्वर भानुदास कान्हे यांची घरफोडी करून चोरट्याने सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड-घनसावंगी महामार्गावरील पांगरखेडा येथील परमेश्वर कान्हे हे आपल्या कुंटुबाबरोबर शेतात सोमवारी (ता.३१)खताची मात्रा देण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान बैलगाडी घेऊन गेले होते. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा अर्धा उघडा दिसला.

तसेच कडी, कोंडा तुटलेला दिसून आले.. त्यानंतर कुंटुबातील सदस्यांनी घराची पाहणी केली असता त्यांच्या मुलाच्या खोलीमध्ये जाण्यासाठी असलेला दरवाजा उघडा दिसून आला. तसेच खोलीमध्ये जाऊन पाहिले असता लाकडी कपाट उघडे दिसले. कडी, कोंडा तुटलेला होता.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, रेणुका, मी तुझा आता संजु काका, आईवडिलांचे छत्र...

कपाटातील एका पिशवीत पत्नीचे व सूनबाईचे सोन्याचे दागिने लंपास झाले. कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कडी, कोंडा तोडून घरातील सोन्याचे गंठण, तीन तोळे ७३ हजार रुपये, सोन्याचे नेकलेस एक तोळ्याचे २५ हजार रुपये, कानातील सोन्याचे झुंबर एक तोळ्याचे २५ हजार रुपये, सोन्याची एक तोळ्यांची एकदानी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख ४३ हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने भरदिवसा डल्ला मारला आहे, अशी लेखी तक्रार कान्हे यांनी अंबड येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यात अशा चोरीच्या घटनांमुळे त्याचे संकट आणखी वाढले आहे.या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भारत बलैय्या हे करत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' House Broken, Jewellery Stolen Ambad News