'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी' | Farmer Leader Vinayakrao Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी'

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने लादलेले जाचक कृषि कायदे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतल्याने शुक्रवारी (ता.१९) उमरगा शहरात काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन जाचक कृषि कायदे मंजूर केले होते. सदरील कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत (दिल्ली), युध्दवीर सिंह (हरियाणा), अॅड. उदय गवारे, शेतकरी नेते विनायकराव पाटील (उमरगा), तेलंगणाचे पी. नायडूसह देशातील हजारो शेतकऱ्यांचे गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमावर्ती भागात अंदोलन सुरु होते. या आंदोलना दरम्यान जवळपास सातशे शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले होते. काँग्रेस नेते राहूल गांधी, सोनिया गांधी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला (Narendra Modi) पाठींबा दिला होता. उमरगा येथे दोन ऑक्टोबरला विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून शेतकरी नेते राकेश टिकैत, युध्दवीर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत 'किसान संवाद परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. (Farm Laws Repeal)

हेही वाचा: नेटकरी म्हणतात, मोदी का घमंड हारा !

या परिषदेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी करण्यात आलेले तीन कायदे रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, नगरसेवक एम.ओ. पाटील, विक्रम मस्के, अतिक मुन्शी, विजय दळगडे, विजय वाघमारे, चंद्रशेखर पवार, पप्पू सगर, वसीम शेख, याकुब नदाफ, दादासाहेब गायकवाड, बाबा मस्के आदींनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला. शेतकरी एकतेचा विजय असो, राहूल गांधी जिंदाबाद ! आदी घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी !

उद्योजकांचे आर्थिक हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले जाचक कृषि कायदे रद्द करण्यासाठी प्रदिर्घ काळ आंदोलन झाले. लखीमपूर खेरीला शांततेने शेतकरी आंदोलन सुरु असताना एका मंत्र्याच्या मुलांने आंदोलन शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून शेतकऱ्याना ठार करण्यात आले होते. आंदोलन कालावधी दरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची केंद्र सरकारला कधीच दया आली नाही. आपले घरदार सोडून ऊन, वारा, थंडीचा कसलाच विचार केला नाही. दिवाळीचा सणही रस्त्यावर केला. लोकशाही पध्दतीने शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असले तरी या आंदोलनात नाहक बळी गेलेल्या शेकडो शेतकरी कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काय ? या आंदोलनामुळे देशातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकुणच शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी, असे मत शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

loading image
go to top