मागणीच नसल्याने भाव मिळेना, शेतकरी दररोज जरबेरा फुले तोडून फेकून देताहेत

वैभव पाटील
Tuesday, 6 October 2020

‘कोरोना’ने जरबेरा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

नायगाव (जि.उस्मानाबाद) : यंदा लग्नसराईत जरबेरा फुलाला हंगामातील उच्चांकी दर मिळणे अपेक्षित होते. पण ‘कोरोना’ने जरबेरा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता सरकारने माल वाहतुकीस परवानगी दिली असली तरी फुलांना मागणीच नसल्याने नायगाव येथील १३ पॉलिहाऊसमधील शेतकरी दररोज एक ते दीड लाख रुपयांची फुले तोडून फेकून देत असल्याची माहिती जरबेरा उत्पादक शेतकरी दत्ता शितोळे व अनंत पाटील यांनी दिली.

इथे तरी विलंब नको! मृत व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल तत्काळ देण्याची गरज

नायगाव, पाडोळी, पिंपरी येथे पॉलिहाऊसमधे जरबेरा फुलाचे उत्पादन घेणारे २० ते २२ शेतकरी आहेत. दहा गुंठ्यापासून २० गुंठ्यांपर्यंत जरबेराचे पॉलिहाऊस आहेत. दरवर्षी लग्नसराईत १५ मार्चपासून जरबेरा फुलांना चांगला भाव येतो. दोन रुपयांपासून १० ते १२ रुपयांपर्यंत एका फुलाला दर मिळतो. या दोन महिन्यांतच जरबेराचे मुबलक पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात. नेमके याच काळात जगासह भारतात ‘कोरोना’ने धुमाकूळ घातला आता वाहतूक सुरु आहे.

लग्नसराई थांबली आहे, त्यामुळे जरबेरा फुलांना मागणीच नसल्याने एकट्या नायगावात रोज शंभर बॉक्स जरबेरा फुलाचे जात होते. एका बॉक्समध्ये ५०० फुले असतात. त्याचे किमान दोन रुपये फुलाप्रमाणे धरले तर दररोज एक लाख रुपयांची फुले नायगाव येथील शेतकरी मागणीच नसल्याने तोडून टाकून देत असल्याचे जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

‘भाषेवर जितके प्रेम अधिक असेल तितकी ती बहरते’

कर्जाचा बोजा कमी झाला असता
फुलांची विक्री सुरु असती तर कर्जाचा बोजा कमी झाला असता. कोरोनामुळे जरबेरा फुलांची वाताहत झाली आहे. पॉलिहाऊससाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी झाला असता. परंतु ‘कोरोना’मुळे ऐन लग्नसराईत जरबेरापासून मिळणाऱ्या उत्पादनाला मुकावे लागले होते. आता तर फुलांना मागणीच नसल्याने फुले तोडून टाकावी लागत असल्याचे व्यथा जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Plucks Gerbera Flowers And Thrown Away Osmanabad News