तुर खरेदीच्या फटक्याने यंदा कपाशीला पसंती

जयपाल गायकवाड
मंगळवार, 16 मे 2017

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने नाफेड मार्फत प्रती पाच हजार रुपये क्किंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु यात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे अधिक फावले. परिणामी आजही शेतकऱ्यांची तुर केंद्रावर पडून आहे

नांदेड - दोन वर्षांच्या दुष्काळानंतर मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला अन शेतकऱ्यांवरील दुष्काळी संकटाची गडद छाया फिकट झाली. यात तुरीचे उत्पादन वाढले. पण सरकारने नाफेड आणि आडत व्यापाऱ्यांचे भले केले. अन शेतकरी तसाच केंद्रावर दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस करत आहे. त्यामुळे यंदा तुरीपेक्षा कपाशीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे.

दोन वर्षांत तुरीचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी तुरीच्या लागवडीवर भर दिला खरा; परंतु केंद्र सरकारने तुरीची निर्यात केल्याने तुरीचा भाव घसरला. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने नाफेड मार्फत प्रती पाच हजार रुपये क्किंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु यात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे अधिक फावले. परिणामी आजही शेतकऱ्यांची तुर केंद्रावर पडून आहे. एकीकडे पेरणीचे दिवस अन दुसरीकडे केंद्रावर तुर पडून असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यासारखी परिस्थिती आहे.

नांदेड जिल्हयात ७ लाख ७३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र हे लागवडीलायक आहे. प्रत्यक्षात या वर्षी ७ लाख ५४ हजार ६६१ हेक्टरवर पेरणी होणार आहे. मागच्या वर्षी ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती. या वेळी कपाशीचे क्षेत्र हे २ लाख ६५ हजार, सोयाबीन २ लाख ८३ हजार , तुर ७८ हजार, ज्वारी ७० हजार तर इतर पिकांचे ७६ हजार ५७५ इतके प्रस्तावित असणार आहे. मागच्या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र हे ३ लाख ११ हजार ७९९ इतके होते. या वर्षी २ लाख ८३ हजार तर कपाशी गत वेळी दोन लाख ५२ हजार ५४७ वरून दोन लाख ६५ हजारवर पोहोचणार आहे.

या वर्षी पाऊसमान चांगले असल्याने पेरणीक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. लागणारे बियाणे हे १ लाख ३५ हजार क्किंटल इतके, असून यात महाबीज व खासगी कंपन्यांचा समावेश आहे. तर खत मागणीपेक्षा जास्त उपलब्ध होणार आहे. जवळपास २ लाख ८५ हजार ७०० मेट्रीक टन खत उपलब्ध होणार आहे. खताची विक्री या वर्षी डीबीटी व्दारे होणार आहे. यात खते व बियाणांचा काळा बाजार होऊ नये, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके जिल्हा परिषद कृषी विभागाने तैनात केले आहेत.

या वेळी खताची उपलब्धता भरपुर आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पिक्‍की पावतीवर स्वाक्षरी घ्यावी. पिकाचे उत्पादन होईपर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे. खताच समतोल वापर करावा व बियाणाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. बियाणाच्या बाबतीत काळा बाजार होत असल्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले.

जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रावर बियाणे व खताची उपलब्धता केलेली आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चांमध्ये चांगले उत्पादन होईल, अशी बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.शिवाय शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे.
- मधुकर मामडे, जिल्हाध्यक्ष, खते व बियाणे विक्री असोसिएशन नांदेड.

प्रत्येक वर्षी विविध बियाणे कंपन्यांकडून बियाणे खेरदीत फसवणुक केली जात असते. अशा विक्रेत्यांवर कृषी विभागाने अंकुश लावणे आवश्यक आहे. तसेच कृत्रिम टंचाई होता कामा नये, याची खबरदारी घ्यावी.
- कृष्णा शिंदे, शेतकरी

Web Title: Farmers prefer cotton this year