औरंगाबाद : पाऊस लांबला, अख्ख्या गावाने उपटली पिके

संतोष शेळके 
बुधवार, 24 जुलै 2019

कमी पाऊस पडल्याने येथील दुबार पेरणीही वाया गेल्याने मंगळवारी (ता. 23) वाहेगाव (देमणी) येथील ग्रामस्थांनी आपापल्या शेतातील सर्वच पिके वखरणी करून मोडली. 

करमाड (जि. औरंगाबाद) - औरंगाबाद तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून वाहेगाव (देमणी)ची ओळख. जेमतेम तीनशे उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या अठराशेच्या आसपास. गावाचा मुख्य व्यवसाय शेती. मात्र, गावात या पावसाळ्यातील सर्वात कमी पाऊस पडल्याने येथील दुबार पेरणीही वाया गेल्याने मंगळवारी (ता. 23) येथील ग्रामस्थांनी आपापल्या शेतातील सर्वच पिके वखरणी करून मोडली. 

मंगळवारी (ता. 23) ग्रामस्थांनी सरपंच वैशाली शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत गाव शिवारातील उभ्या पिकात वखर चालवून पिके नष्ट करण्याचे काम शेतकऱ्यांनी केले. तत्पूर्वी, याची सरकारी नोंद व्हावी म्हणून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना घटनास्थळी बोलावून घेत पंचनामा करण्यास भाग पाडले. 
करमाड मंडळाअंतर्गत हे गाव येते. मात्र, करमाड मंडळात मागील दीड महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. वाहेगावात मागील वीस ते बावीस वर्षांत प्रथमच इतका कमी पाऊस पडला आहे. त्यात मागील तीन वर्षांपासून दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. यावर्षी तर गाव शिवारात आतापर्यंत फक्त तीनदा पाऊस पडला, तो ही फक्त भिज पाऊस. यावरच येथील शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, बाजरीची पेरणी केली. त्यानंतर झालेल्या एका भिज पावसावर पिके उगवली. मात्र, पुन्हा पाऊसच न आल्याने काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. 

त्यानंतरही पाऊसच न पडल्याने ही दुबार पेरणीही वाया गेल्याने या गावचे लाखो रुपये मातीत गेले. येथील रामेश्वर शिंदे यांनी एक एकर मक्‍याची दुबार पेरणी केली होती, तीही वाया गेल्याने मागील आठवड्यातच ती वखरून फेकल्याचे सांगितले. यात त्यांचा आतापर्यंत सुमारे नऊ हजारांचा खर्च वाया गेला. प्रभाकर शिंदे यांनीही दुबार लागवड केलेल्या कपाशी पिकात वखर चालविल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित राजू शिंदे, आत्माराम शिंदे, शिवनाथ शिंदे, आप्पासाहेब शिंदे, जिजा शिंदे यांनाही आपबीती सांगितली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers removed crops due to lower rain