esakal | शेतकऱ्याच्या मुलाची उपजिल्‍हाधिकारी पदाला गवसणी
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc student

हिंगोली तालुक्‍यातील साटंबा येथील एका शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर घ्यार यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवित उपजिल्‍हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील  चिमेगाव येथील डॉ. सीमा घुगे यांनीही स्पर्धा परीक्षेत यश मिळवित नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.  

शेतकऱ्याच्या मुलाची उपजिल्‍हाधिकारी पदाला गवसणी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्‍यातील साटंबा येथील एका शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर घ्यार यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवित उपजिल्‍हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्‍यांच्या निवडीबद्दल गावात जल्‍लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला.

तालुक्‍यातील साटंबा येथील प्रल्‍हाद घ्यार या शेतकऱ्यांचा मुलगा ज्ञानेश्वर घ्यार यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. दहावी व बारावीचे शिक्षण हिंगोली जिल्‍ह्यातच झाले. घरची परिस्थिती बेताचीच आहे. तसेच घरात प्रशासकीय सेवेचा कोणताही वारसा नाही.

हेही वाचापरभणीचा मुकूल विटेकर राज्यात प्रथम -

डाक सहायक या पदावर नियुक्‍ती

 या स्‍थितीत स्‍पर्धा परीक्षा संदर्भात वृत्तपत्रे व शिकवणी वर्गातून माहिती मिळाल्यानंतर त्‍यांनी आपल्याला मोठा अधिकारी व्हायचे हे स्‍वप्न बाळगले. त्‍यानंतर सर्वच स्‍पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. सतत अभ्यास व कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्याने पहिल्याच प्रयत्नात दोन वर्षापूर्वी चंद्रपुर येथे भारतीय टपाल खात्यात डाक सहायक या पदावर नियुक्‍ती मिळाली. 

उपाधीक्षक भूमी अभिलेख परीक्षेत यश

डाक सहायक म्‍हणून काम करीत असताना त्‍यानी स्‍पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या उपाधीक्षक भूमी अभिलेख या पदाच्या परीक्षेत देखील यशस्‍वीपणे यश मिळविले. ते सध्या नांदेड येथे कार्यरत आहेत. दीड वर्षापूर्वी झालेल्या राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज केला. त्‍यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीत चांगले गुण प्राप्त केले.

उपजिल्‍हाधिकारी पदावर संधी

शुक्रवारी (ता.१९) जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निकालात उपजिल्‍हाधिकारी पदावर संधी मिळाली. त्याच्या यशाबद्दल साटंबा गावात एकच जल्‍लोष करून त्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

सतत अभ्यास केला पाहिजे

अभ्यास करीत असताना माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी सतत प्रोत्‍साहान दिले. त्यामुळे बळ मिळाले व आज या पदावर पोचलो आहे. कोणतीही परीक्षा देताना मन लावून अभ्यास करणे, सतत मनन करून लिखान केल्यास पाठांतर वाढते. त्‍याचा उपयोग परीक्षेत नक्‍कीच होतो. यासाठी मात्र सतत अभ्यास केला पाहिजे.
-ज्ञानेश्वर घ्यार
 

 

येथे क्लिक करा - बैलजोडी, बैलगाडीसह दांपत्य गेले वाहून -


डॉ. सीमा घुगे यांची नायब तहसीलदार पदी निवड

हिंगोली : चिमेगाव (ता. औंढा नागनाथ) येथील डॉ. सीमा घुगे यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळविले असून त्यांची नायब तहसीलदार म्‍हणून निवड झाली आहे. चिमेगाव येथील माजी सरपंच नामदेवराव घुगे यांच्या सून डॉ. सीमा सुनिल घुगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दीड वर्षापूर्वी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाला शुक्रवारी जाहीर झाला. 

दहावीपर्यंतचे शिक्षण खारघर येथे

यात त्‍या यशस्‍वी झाल्याने त्‍यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. डॉ. सीमा घुगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गोखले हायस्कूल खारघर येथे ; तर बारावीपर्यंचे शिक्षण भारती विद्यापीठ बेलापूर येथे झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आर. ए. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरळी (मुंबई) येथे झाले आहे. 

यशात पतीचा मोलाचा

तेथेच त्यांनी एमडी केले. डॉ. सीमा घुगे यांचे माहेर आघाववाडी (ता. जिंतूर) असून वडील भिकाजी कांदे हे वाशी येथील बाजार समितीत निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. डॉ. सीमा घुगे यांच्या यशामागे त्याचे पती डॉ. सुनील घुगे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्‍यांनी सांगितले.