
केज : वाढता उत्पादन खर्च व शेती उत्पादन याचा मेळ लागत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणींत सापडत आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण यावर होणाऱ्या खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. या कर्जाच्या काळजीने हवालदिल होऊन मागील साडेचार वर्षांत शासकीय नोंदीनुसार तालुक्यात १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने विविध कृषी योजना प्रभावीपणे राबवत व सिंचन सुविधांत वाढ करून शेतीमालाला हमी भाव मिळवून देण्याची आवश्यकता आहे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करण्याची वेळ येणे ही दुर्दैवाची बाब आहे. निसर्गाचा लहरीपणा, वाढत्या महागाईमुळे वाढता उत्पादन खर्च व शेतीमालाला हमीभावाचा अभाव या कारणांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींत सापडलेला आहे. त्यातच शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा ठरावीकच शेतकऱ्यांना मिळतो. तथापि जाचक अटींमुळे शेतकरी या योजनांकडे पाठ फिरवतात. सामान्य अल्पभूधारक शेतकरी सोयीस्करपणे दुर्लक्षित होत आहे. यास अनेक बाबी कारणीभूत असल्याचे दिसून येते.
शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही ताळमेळ लागत नाही. त्यातच वाढती महागाई, शेतमजुरांची कमतरता, कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व मुलींच्या लग्नासाठी करावा लागणारा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी आयुष्यभर कर्जाच्या विळख्यात सापडलेला असतो. तरीही आज ना उद्या आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, या आशेवर काळ्या आईची निष्ठेने सेवा करत रात्रंदिवस राब-राबत राबत असतो.
आपल्या मनात होणारी घालमेल तो व्यक्त करणार तरी कोणाकडे? त्यामुळे आपलं मनातलं दुःख दाबून तो येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जात असतो. मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही. वाढत जाणारा कर्जाचा बोजा सहन न झाल्याने कुणालाही दोष न देता अनेक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा परिस्थितीत कृषीप्रधान असलेल्या देशात केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे शेती विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या कष्टाला महत्त्व देऊन शेती व्यवसायाला अच्छे दिन आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच कृषी पदवी मिळविलेले तरूण शेतीकडे वळतील. पर्यायाने कृषी क्षेत्राला चांगले दिवस येऊन शेतकरी आत्महत्येला पूर्णविराम मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.