शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - चांगले दर मिळतील या अपेक्षेने बाजार समितीत आणलेली मेथी, शेपू, कोथिंबिरीला ५० पैशांचा दर मिळाला. या कवडीमोल भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ११) सोबत आणलेला माल रस्त्यावर फेकून दिला. 

औरंगाबाद - चांगले दर मिळतील या अपेक्षेने बाजार समितीत आणलेली मेथी, शेपू, कोथिंबिरीला ५० पैशांचा दर मिळाला. या कवडीमोल भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ११) सोबत आणलेला माल रस्त्यावर फेकून दिला. 

गेल्या आठवडाभरापासून बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक वाढली असली तरी चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दरात माल विकावा लागत आहे. बाजार समितीत शनिवारी दोन हजार ५०० क्‍विंटल भाजीपाला आला. यामध्ये ३० क्‍विंटल धान्य, ४०० क्‍विंटल फळे, ५५ हजार मेथीच्या जुड्या, ४५ हजार शेपूच्या जुड्या, ३९ हजार ५०० पालकच्या जुडीची आवक झाली. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर काहींनी माघारी नेला. विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेला माल उचलण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांना हा भाजीपाला उचलून नेला. तर उर्वरित भाजीपाल्यावर मोकाट जनावारांनी ताव मारला. 

शहरातील हातगाड्यावर हीच मेथी, शेपू, कोथिंबिरीची पाच ते सात रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी होत असल्याचा आरोप भाजीपाला विक्रेत्यांनी केला. 

या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच येत असून भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

भाजीपाल्याचे दर कोसळले
पालेभाज्यांबरोबरच भेंडी, दुधी भोपळा, काकडी, बटाटा व टोमॅटाेची आवक जास्त असल्याने अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही. भेंडी- ५१ क्‍विंटल, दुधी भोपळा- २१, बटाटा- ६००, टोमॅटो- ४६० तर काकडी- १११ क्विंटल आवक झाली. किरकोळ बाजारात भेंडी १५ ते २० रुपये, काकडी १० रुपये, बटाटा १५ ते २०, तर टोमॅटो १० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.

Web Title: farmers throw the vegetables on the road aurangabad