जनावरांना लम्पीस्कीनच्या लागणीमुळे शेतकरी हैराण

राम काळगे
Saturday, 24 October 2020

जनावरांना होत असलेल्या लम्पीस्कीन या रोगामुळे शेतकरी हैराण झाला असून पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

निलंगा (जि.लातूर)  : जनावरांना होत असलेल्या लम्पीस्कीन या रोगामुळे शेतकरी हैराण झाला असून पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून हा रोग कमी होत नसल्यामुळे बळीराजा चिंतित झाला आहे. सध्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकरी पूर्वीचा अडचणीत असून सततच्या संकटामुळे हैराण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून खरीप हंगामातील पेरणीपासून अनेक संकटे शेतकऱ्यांवर आली आहे.

यंदा शेतकऱ्यांना सोयाबीनचे बोगस बियाणे मिळाल्याने उगवण झाली नाही. त्यामुळे त्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अशा आर्थिक अडचणीत असतानाच सोयाबीनच्या मागे लागलेले विविध रोगाचे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांना अस्वस्थ केले. शिवाय तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढून ठेवलेले सोयाबीन व सध्या रानावर असलेली तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उडीद, मूग पिकावर रोगाचा पावसाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हे पीक हाताला लागले नाही. त्यातच अतिवृष्टी आता अशा नैसर्गिक संकटात जनावरात आता लम्पीस्कीन नावाच्या रोगाची लागण झाली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार सोडतीने हरभरा बियाणे, कृषी विभागाकडून याद्या तयार करणे सुरु

पशुपालकात चिंता निर्माण झाली असून शेतकऱ्यांत धास्तीचे वातावरण आहे. तालुक्यात या रोगाची लागण असलेले काही जनावरे आढळून आल्याने शेतकऱ्यांना आता आपापल्या जनावरांची काळजी घ्यावी लागणार आहे. या रोगामुळे बाधीत जनावरांच्या मानेवर, पायावर व शरीराच्या इतर भागावर साधारण सुपारीच्या आकाराच्या गाठी दिसुन येत आहेत. शिवाय जनावराच्या चारा-खाणे पाणी पिण्याच्या प्रमाणातही बदल जाणवतो. अशा जनावरांना इतर जनावरापासून अलिप्त ठेवणे हा एक पर्याय आहे.

काही जनावरात लक्षणे आढळून आल्याने शेतकऱ्यांना आता नव्या चिंतेने ग्रासले आहे. या आजाराच्या कचाट्यातुन आपले पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाने आता लसीकरणाची तात्काळ सोय करावी अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे. लम्पीस्कीन या रोगापासुन जनावरांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ याचे गांभीर्य ओळखुन लसीकरणाची सोय करावी. अगोदरच सोयाबीन पिकावर नैसर्गिक संकट आले आहे. त्यात आणखीनच भर या रोगामुळे पङली आहे. यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत. म्हणुन प्रशासनाने तात्काळ यावर औषध उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers In Trouble Due To Lumpy skin Disease To Cattles Latur News