Republic Day 2020- पारदर्शक कर्जमुक्तीमुळे शेतकरी चिंतामुक्त- वर्षा गायकवाड

फोटो
फोटो

हिंगोली : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा राज्य शासनाने केली असून यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच चिंतामुक्त होतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकूळे, माजी. खा. राजीव सातव, माजी. आ. डॉ. सतीश टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

जगात भारतीय लोकशाही श्रेष्ठ ठरली

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड पुढे म्हणाल्या की, लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी, 1950 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. आणि जगामध्ये भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. लोकशाही तंत्राच्या घटनेनूसार देशाचा कारभार सुरु झाला. नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस विदितच आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी अमूल्य योगदान लाभले. त्यामुळेच आज जगात भारतीय लोकशाही श्रेष्ठ ठरली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली असून, यास "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" नाव देण्यात आलं आहे. यामध्ये एक एप्रिल, 2015 ते 31  मार्च, 2019 पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर, 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना अल्प/अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात 2 लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल आणि व्याजासह 30 सप्टेंबर, 2019 रोजी थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्त होणार आहेत. शेतकरी बांधवांना कोणत्याही अटीशिवाय ही कर्जमाफी मिळणार असून, याकरीता शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्जखात्याशी संलग्न करुन त्याचे प्रमाणीकरण करुन घ्यावे. कर्जमाफीच्या अनुषंगाने शेतकरी बांधावासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे पालकमंत्री श्रीमती गायकवाड यावेळी म्हणाल्या.

‘शिवभोजन’ योजनेची आजपासून

राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तिंना केवळ 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येणार आहे. या ‘शिवभोजन’ योजनेची आजपासून राज्यभरात अंमलबजावणी सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात येथील जिल्हा रुग्णालय परिसरात आजपासून ‘शिवभोजन’ केंद्राची सुरुवात होत आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची सोय होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा या कोणतेही शासकीय अनुदान न घेता डिजीटल करण्यात आल्या आहे. 

आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

नूकतेच राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील वीजपुरवठा आणि विजेवरील खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौरऊर्जा उपकरणे बसवण्याचा तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दतीत बदल होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या शालेय बसची सुरक्षितता तपासून घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी आठवण व्हावी यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मुलांवर शालेय जीवनापासूनच समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता हे पंचसुत्री संविधानिक संस्कार करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या उपक्रमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. 

शिक्षण हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय

शिक्षण हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्‍त कामांचा बोजा पडणार नाही याबाबत देखील शासन काळजी घेणार आहे. तसेच राज्यातील साडे तीन लाख शिक्षकांना सन 2016 ते 2018 या कालावधीतील 7 व्या वेतन आयोगातील फरक देणे प्रलंबीत होते. तो फरक साडे तीन लाख शिक्षकांना देण्यात आल्याचे ही पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या.

जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार 570 शेतकऱ्यांना मदत

अतिवृष्टीमुळे बाधीत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार 570 शेतकऱ्यांना मदत म्हणुन 171 कोटी 25 लाख निधी वितरीत करण्यात आला असून, उर्वरीत 69 हजार 390 शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 51 लाख एवढ्या अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत जिल्ह्याला शासनाकडून प्राप्त निधीपैकी 51 कोटी 46 लाख निधी विविध योजनावर खर्च करत जिल्हा  राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तिर्थक्षेत्र औंढा नागनाथ व नर्सी नामदेव यांच्या सर्वागिंन विकासासाठी आमचे सरकार कटीबध्द असल्याचे आहे. तसेच जिल्ह्याने सशस्त्र ध्वज दिन निधीचे 145 टक्के उद्दीष्ट साध्य केले असून, आपल्या जिल्ह्यासाठी हि अभिमानाची बाब आहे. या वर्षी ही ध्वज दिन निधीचे उद्दिष्टपूर्तीकरीता आपण सर्वांनी मदत करावी असे आवाहन ही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले.

हिंगोली जिल्ह्याचे दूसऱ्यांदा पालकमंत्री

हिंगोली जिल्ह्याचे दूसऱ्यांदा पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारतांना मला आनंद होत असून, आपल्या जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. याकरीता आपण जागरुक नागरिक म्हणुन हातभार लावावा असे ही पालकमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली.

विविध पथकाकांडून मानवंदना

प्रारंभी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, अग्निशमन दल, नॅशनल कॅडेट कोर, आपत्ती व्यवस्थापन चित्ररथ, सामाजीक वनीकरणाचा हरीत चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी देखील या संचलनात सहभागी झाले होते.
            
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ
 
हिंगोली : राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तिंसाठी केवळ 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात करीता  ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. या ‘शिवभोजन’ योजनेची पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

त्याअनुषंगाने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते येथील जिल्हा रुग्णालय परिसरात ‘शिवभोजन’ केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शिवभोजन थाळी वितरीत करण्यात आली. पुढील टप्प्यात जिल्ह्यात शिवभोजन केंद्राची सुरुवात करण्यात येणार असून, या योजनेमुळे गरीब व गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची सोय होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी माजी. खा. राजीव सातव, माजी. आ. डॉ. सतीश टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com