37 गुंठ्यांत घेतले चार लाखांचे उत्पन्न, दुष्काळातही जगविली डाळिंबाची बाग

डाळिंबाची शेती.
डाळिंबाची शेती.

औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळात पाण्याची तीव्र टंचाई असताना एक किलोमीटर अंतरावरून स्वत:च्या आणि कमी पडल्यानंतर शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन शेततळ्यात आणले आणि डाळिंबाची बाग जगविली. ज्या 37 गुंठ्यांमध्ये पूर्वी पारंपरिक पीक घेऊन 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न व्हायचे त्याच 37 गुंठ्यांतून डाळिंबाने सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न दिले. उत्तम दर्जाच्या पोसलेल्या डाळिंबाने आडगाव सरक (ता.जि. औरंगाबाद) येथील अशोक दगडू पठाडे यांना तारले. 

शहरापासून सुमारे 13-14 किलोमीटरवर असलेले डोंगराळ भागातील आडगाव. यंदाच्या दुष्काळामुळे सगळीकडे पाण्याची तीव्र टंचाई मग त्यात डोंगराळ भागात असलेल्या आडगावच्या शिवारात पाणी मिळणे फार मोठी गोष्ट. "व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन'मध्ये या गावाचा समावेश झाल्याने "जनजागृती प्रतिष्ठान'च्या माध्यातून या गावात कामे सुरू झाली. गटशेतीचे प्रणेते व फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी अशोक पठाडे यांच्या शेतीला भेट दिली. अशोक पठाडे यांची माळरानावर हलक्‍या प्रतीची पावणेचार एकर एका ठिकाणी, तर तिथून एक किलोमीटर अंतरावर एक एकर अशी पावणेपाच एकर शेतजमीन आहे.

श्री. पठाडे यांनी सांगितले, की डॉ. कापसे यांनी जमीन पाहिल्यानंतर डाळिंबाची लागवड करण्याचा सल्ला दिला. यापूर्वी कपाशीचे पारंपरिक पीक घेत होतो. एका एकरातून फक्‍त 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळायचे; मात्र 37 गुंठ्यांत डाळिंबाचे "भगवा' वाण लावले. यावेळी पहिलीच तोडणी झाली. 45 ते 50 हजार रुपये पूर्ण खर्च आला. डाळिंब नाशिकच्या मार्केटमध्ये विकले. सर्वांत जास्त 110 रुपयांप्रमाणे किलोला भाव मिळाला, एवढ्या चांगल्या दर्जाची फळे पोसली होती. 37 गुंठ्यांतून जवळपास चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. याशिवाय आंतरपीक म्हणून मूग आणि भुईमुगाची लागवड केली आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न वेगळेच असेल, असेही त्यांनी सांगितले. 
 
एक किलोमीटरहून आणले पाणी 
शेतात 100 बाय 100 आकाराचे आणि 30 फूट खोल शेततळे तयार केले आहे. या शेततळ्यात एक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवरून पाणी आणून टाकतो; मात्र यंदाच्या उन्हाळ्यात विहिरीलाही कमी पाणी होते. यामुळे स्वत:च्या विहिरीचे काही आणि शेजाऱ्यांच्या विहिरीतून शेततळ्यात पाणी आणले आणि बाग जगविल्याचे श्री. पठाडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com