औरंगाबाद : क्रांतीचौकात मृत बालिकेला फेकताना वडील ताब्यात 

मनोज साखरे 
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

वडिलांनी आपल्या मृत दोन वर्षीय बालिकेला खोदलेल्या खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहणाऱ्यांनी त्याला लगेचच रोखत बेदम चोप दिला.

औरंगाबाद : औरंगाबादेतील क्रांतीचौकात विकासकाम सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात एका वडिलाने आपल्या मृत दोन वर्षीय बालिकेला टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहणाऱ्यांनी त्याला लगेचच रोखत बेदम चोप दिला. तो नशेच्या भरात होता. यावेळी त्याची पत्नीही सोबत होती. हा प्रकार शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. 

माहिती देताना क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक यू. डी. मूळक म्हणाले, "रेल्वेस्थानक येथून मुलीला घेऊन एक वडील क्रांतिचौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आला. तेथे खोदलेल्या एका खड्ड्यात तो त्याच्या मृत मुलीला टाकीत होता. काही नागरिकांनी ही बाब पहिली त्यांनी लगेचच पित्याला रोखले. त्यानंतर त्याला बेदम चोप दिला.

दरम्यान, क्रांतिचौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, तो नशेत होता व ठाण्यात आणल्यानंतर बडबडत होता. त्याला घाटी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. " याबाबत घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की दोन ते अडीच वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण ती मृत होती. तिची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father arrested for throwing dead girl in aurangabad