मुलगी हवी म्हणून निर्दयी बापानेच केला चिमुकल्या मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मला मुलगीच हवी. जन्माला आलेले मूल माझे नाही, असे म्हणत बापानेच आपल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा दगडी बत्त्याने ठेचून खून केला. या घटनेनंतर पत्नीने पोलिसांकडे धाव घेत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून निर्दयी बापाला रविवारी (ता. 11) अटक केली. 

लातूर : मला मुलगीच हवी. जन्माला आलेले मूल माझे नाही, असे म्हणत बापानेच आपल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा दगडी बत्त्याने ठेचून खून केला. या घटनेनंतर पत्नीने पोलिसांकडे धाव घेत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून निर्दयी बापाला रविवारी (ता. 11) अटक केली. 
ही घटना शनिवारी (ता. 10) मध्यरात्री घडली. संजयनगर भागात राहणाऱ्या सोमनाथ शिवाजी साळुंके याला स्वप्नील नावाचा आठ महिन्यांचा मुलगा होता;

पण हा मुलगा आपला नाही, म्हणत सोमनाथ हा गरम चहाचे चटके देत, डोळ्यांत 
मिरची टाकत, तोंडात तिखट भाजी घालत मुलाला त्रास देऊ लागला. घटनेच्या दिवशी लोखंडी उलथने आणि दगडी बत्ता डोक्‍यात घालून त्याने आपल्या मुलाचा खून केला. हा प्रकार राहत्या घरातच घडला. 

ही घटना मुलाची आई माधुरी (वय 24) यांना समजताच त्यांनी विवेकानंद चौक पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमनाथ हा मजुरी करायचा. तर पत्नी घरकाम करायची. स्वप्नील हा त्यांचा दुसरा मुलगा होता. त्याच्या खुनाच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. एच. पाटील हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father murdered his own child