

Chhatrapati Sambhajinagar FDA Action Seizes 197480 Kg of Food Products Worth 4.19 Crore From Two Cold Storage Facilities
esakal
-रविंद्र गायकवाड
बिडकीन: सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. १७ ऑक्टोबर रोजी बिडकीन (ता. पैठण) आणि शिवराई (ता. गंगापूर) येथील दोन शीतगृहांची तपासणी करून एकूण १ लाख ९७ हजार ४८० किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ४ कोटी १९ लाख ४७ हजार ६३४ रुपये असल्याचे कारवाईच्या तपशिलावरून स्पष्ट होते. जप्त साठ्यामध्ये मिरची पावडर, मनुका, गूळ आणि बटर यांचा समावेश आहे. दोन्ही शीतगृहांमध्ये स्वच्छता, तापमान नियंत्रण आणि अन्नसाठवणुकीसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित संस्थांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.