एक जुनपासून परभणीत ऑनलाईन खत विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

खत विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम थेट कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर सबसीडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आवश्यक आहेत. आता मोजक्याच दुकानांवर ऑनलाईन खत मिळणार असल्यामुळे खतांसाठी पुन्हा पुर्वीचे दिवस येणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे

परभणी -  रासायनिक खतांची सबसीडी (अनुदान) आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४६९ खत विक्रेत्यांना पॉस मशिन (पॉईंट ऑफ सेल) देण्यात येणार आहेत. या मशीन तुटपुंज्या असून उर्वरीत विक्रेत्यांकडे मशीन येणार नसल्याने खत खरेदीसाठी ठरावीक दुकानांवर गर्दी होणार आहे. दरम्याण अनुदान नंतर जमा होणार असल्याने खरेदी करताना मात्र पूर्ण रक्कम भरावी लागणार असून त्यामुळे खताच्या किमती वाढणार असल्याच्या अफवा सुरु झाल्या आहेत.

राज्यात रासायनिक खताच्या विक्रीवरील अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत संबधीत उत्पादकांना अदा केले जाते. परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. विक्रेते याची खबरही शेतकऱ्यांना लागू देत नाहीत. त्यामुळे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात रासायनिक खत विक्री करीता थेटलाभ हस्तांतरण प्रकल्प (ता.एक) जून पासुन राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे पॉस मशिन (पॉईंट ऑफ सेल) नोंदणी केलेल्या किरकोळ खत विक्रेत्यांना खत उत्पादक, पुरवठादार कंपन्या मार्फत देण्यात येणार आहे. खत विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम थेट कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर सबसीडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आवश्यक आहेत. आता मोजक्याच दुकानांवर ऑनलाईन खत मिळणार असल्यामुळे खतांसाठी पुन्हा पुर्वीचे दिवस येणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे.

३८ हजार मेट्रीक टन खत
जिल्ह्यात सध्या ३८ हजार ४७१ मेट्रीक टन खत पडुन आहे. मागील तीन वर्षात दुष्काळामुळे खताची विक्री घटली होती. त्यामुळे मागील वर्षीचा आणि यंदाचा खत वापराविणा पडुन आहे. असे असले तरी विक्रेत्यांची संख्या घटणार असल्याने काही ठरावीक दुकानांवर गर्दी होणार आहे.

४६९ विक्रेत्यांना मिळणार मशिन
जिल्ह्यातील एक हजार ५१५ खत विक्रेत्यांपैकी कृषी विभागाकडे पॉस मशिनसाठी ९५७ दुकानदारांनी नोंदणी केली आहे. मागील दोन वर्षांपासून यासाठी काम सुरु करण्यात आले होते. त्यानूसार तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ज्या खत विक्रेत्यांनी ऑनलाईन खतांचे ट्रांझीक्शन दाखवले आहे, अशा केवळ ४६९ खत विक्रेत्यांना सध्या या मशिन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात हंगामाच्या सुरवातीला केवळ ४६९ खत विक्रेतेच खत विकू शकणार आहेत. त्यामुळे खतासाठी मारामार होण्याची शक्यता आहे.

आता रोख व्यवहार
शेतकऱ्यांजवळ पेरणीच्या वेळी पैशाची अडचण असते. अशा वेळी ओळखीचे आणि नेहमीच्या संबंधातील दुकानदार हेच त्यांना उधारीवर खत, बियाणे देत असत. त्यामुळे ऐन वेळेस शेतकऱ्यांची नड भागवली जाते. परंतु आता ऑनलाईन पध्दतीने खत मिळणार असल्याने दुकानदारांचाही नाईलाज होणार आहे.

Web Title: fertilizers to be sold online in Parbhani