खते, बियाणांची दुकाने तीन दिवस राहणार सुरू 

राजेश दारव्हेकर
शुक्रवार, 27 मार्च 2020

हिंगोली जिल्‍ह्यातील बी-बियाणे, किटकनाशके व खते यांची विक्री केंद्र आठवड्यातून तीन दिवस बुधवार, शुक्रवार व रविवार सकाळी दहा ते एक या वेळात सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्‍ह्यात गर्दीवर पाबंद घालण्यात आले आहेत. परंतु, जीवनावश्यक वस्‍तूंच्या दुकानासाठी नियम शिथील आहेत. आता जिल्‍ह्यातील बी-बियाणे, किटकनाशके व खते यांची विक्री केंद्र आठवड्यातून तीन दिवस बुधवार, शुक्रवार व रविवार सकाळी दहा ते एक या वेळात सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा, १९८७ (ता.१३) मार्च २०२० पासून लागू करून खंड दोन, तीन व चार मधील तरतुदीच्या अमंलबजावणी करण्यात येत आहेत. जिल्‍ह्यातील संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तत्‍काळ नियंत्रण करणे, विषाणूंचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्‍काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आपत्ती जनक परिस्‍थिती उद्भवू नये, यासाठी पूर्व तयारी करणे महत्वाचे झाले आहे. 

हेही वाचाहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर

आपती व्यवस्‍थापन कायदा लागू 

या पार्श्चभूमीवर जिल्‍ह्यात आपती व्यवस्‍थापन कायदा लागू झाल्याचे घोषीत करण्यात आले आहे. पूर्व तयारी व प्रत्‍यक्ष अंलबजावणी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (एक) व (तीन) अन्वये जिल्‍ह्यात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्‍यानुसार जिल्‍ह्यातील सर्व खासगी व्यवस्‍थापन व आस्‍थापना बंद करण्यात आले आहेत. 

किटकनाशके व खते विक्री केंद्राचा समावेश

स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, किटकनाशके व खते यांचा तुटवडा होऊ नये म्‍हणून जीवनाश्यक वस्‍तू अधिनियम १९५५ चे कलम तीन (दोन), (ड) अन्वये जिल्‍ह्यातील बि-बियाणे, किटकनाशके व खते यांची विक्री केंद्र आठवड्यातील बुधवार, शुक्रवार व रविवार या दिवशी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

येथे क्लिक कराकळमनुरीतील भाजीमंडईत खरेदीसाठी झुंबड

नियामाचे पालन करणे गरजेचे

दम्‍यान, जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांना नियामाचे पालन करणे गरजेचे आहे. दुकाने सुरू असताना गर्दी न होऊ देणे, प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हात धुण्यास प्रोत्साहित करणे, एक मीटरचे अंतर ठेवणे, वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करणे व प्रशासनाला सहकार्य करणे आदी गोष्टीचे पालन करणे बंधणकारक करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी व सर्व नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन हिंगोली जिल्हा सीड, फर्टि, पेस्ट, डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आनंद निलावार यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizers, seed stores continue to stay for three days