पंधरा वर्षांनंतर रिंगरोडचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

उदगीर - उदगीर शहरालगत असलेल्या रिंग रोडवर काही प्लॉटधारकांनी आक्षेप घेतल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून पेच निर्माण झाला होता. नळेगाव रोडच्या दक्षिणेकडील रिंगरोडचे काम होऊन, त्यावर वाहतूकही सुरू झाली; मात्र मागील पंधरा वर्षांपासून नळेगाव रस्त्याच्या उत्तरेकडील संपादित रिंग रोडवर साधे खडीकरणही झाले नव्हते. त्यासाठी आमदार भालेराव यांनी रविवारी (ता. तीन) प्लॉटधारकांसोबत मध्यस्थी करून समाधानकारक तोडगा काढून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोहर भंडे पाटील, कनिष्ठ अभियंता अनिल कांबळे उपस्थित होते. पंधरा वर्षांपूर्वी उदगीर शहरासाठी रिंग रोडला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर जमिनी संपादित करण्यात आल्या. एमआयडीसीपासून मलकापूर, नळेगावरोड मार्गे बिदर रोडला मिळवण्यात आला. त्यानंतर नळेगाव रस्त्यापासून ते बिदर रस्त्यापर्यंत खडीकरण व हॉटमिक्‍सचे काम करुण्यात आले व त्यावरून वाहतूकही सुरू करण्यात आली; मात्र नळेगाव रस्ता ते एमआयडीसी या रस्त्यावरील नवीन शासकीय विश्रामगृहाजवळील प्लॉटधारकांनी आक्षेप घेऊन या रस्त्याचे काम अडवले होते.

गेल्या अधिवेशनात आमदार सुधाकर भालेराव यांनी या रस्त्याच्या खडीकरण व हॉटमिक्‍स डांबरीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून निधी मंजूर करून घेतला होता. निधी मंजूर होऊनही रस्त्याचे काम करण्यात आक्षेप घेतल्यामुळे अडचणी येत होत्या. त्यानंतर आमदार भालेराव यांनी रविवारी (ता. तीन) संबंधितांना "ऑन दि स्पॉट‘ बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांचा गैरसमज दूर करून पर्याय काढला व कामाला सुरवात केली.
उदगीर शहरातील नांदेड-बिदर रस्त्यावर नांदेडहून हैदराबादकडे व बिदरकडे व बिदरहून नांदेडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरातील वाहतूक ठप्प होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या वळण रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मदत होणार आहे.

काही महिन्यांत रिंग रोड कार्यान्वित....
नळेगाव रोड ते एमआयडीसी रिंग रोडच्या कामाची सुरवात करण्यात आली असून येत्या काही महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यावर हॉटमिक्‍स डांबरीकरणाचे काम पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुधाकर भालेराव यांनी दिली.

Web Title: Fifteen years after passage ringrode