५८ छावण्या बंद; ७२ हजार जनावरे झाली कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

 जिल्ह्यातील तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व चारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या; परंतु हळूहळू चारा छावण्या बंद होत असून ६०३ पैकी ५८ चारा छावण्या बंद झाल्या आहेत.

बीड - जिल्ह्यातील तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व चारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या; परंतु हळूहळू चारा छावण्या बंद होत असून ६०३ पैकी ५८ चारा छावण्या बंद झाल्या आहेत. तब्बल ७२ हजार जनावरांची संख्या घटली आहे. सध्या ५४५ चारा छावण्यांमध्ये तीन लाख ४९ हजार जनावरे आहेत. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा बहुतांश छावणीचालकांनी जनावरांच्या चाऱ्याच्या मापात पाप करायला सुरवात केली आहे. अगदी १८ ऐवजी दहा किलोच चारा जनावरांना देण्यात येत आहे; मात्र हवालदिल शेतकऱ्यांचा नाइलाज होत आहे.

जिल्ह्यात मागील हंगामात वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. त्यात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाचे नुकसान झाले. परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बीची पेरणीही झाली नाही. परिणामी चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. मोठा पाऊस नसल्याने जलस्रोतही लवकरच कोरडे पडले. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. यानंतर शासनाने चारा छावण्या सुरू केल्या. जिल्ह्यात ९३३ चारा छावण्यांना मंजुरी मिळाली. त्यातील ६०३ चारा छावण्या प्रत्यक्ष सुरू होऊन चार लाख २१ हजार लहान-मोठी जनावरे छावणीत दाखल झाली. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे स्वत:च्या गोठ्यात नेली. काही ठिकाणी चारा व्यवस्थित दिला जात नसल्याने शेतकऱ्यांनी छावणीतली जनावरे गोठ्यात नेली. त्यामुळे ५८ छावण्या बंद होऊन ७२ हजार जनावरे कमी झाली आहेत. 

प्रशासनाची ढिलाई अन्‌ चाऱ्याच्या मापात पाप
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सुरवातीला स्वतः काही छावण्यांना भेटी दिल्यानंतर छावणीचालकांची मनमानी आणि अनियमितता समोर आली. त्यामुळे त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत छावण्यांची तपासणी केली. विभागीय आयुक्तांनी स्थापन केलेल्या पथकानेही तपासण्या केल्या. यात मोठा गोलमाल समोर आला. मात्र, या तपासण्या संपून अहवाल सादर झाले खरे; पण ठोस कारवाया झाल्या नाहीत. अलीकडे प्रशासन खरीप हंगामाच्या तयारीच्या कामाला गुंतल्याने छावण्यांकडील लक्ष कमी झाले. त्यामुळे छावणीचालकांनी पुन्हा शेतकऱ्यांना आपला रंग दाखवायला सुरवात केली आहे. 

प्रशासनही हवालदिल
चारा छावणी चालकांसोबत काही ठिकाणी तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंत लागेबांधे असल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही उपयोग होत नाही. बड्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर गौडबंगाल समोर आले तरी राजकीय दबाव आल्याने कारवाया करण्यात अडचणी येत आहेत. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाया करायच्या तरी किती? असाही पेच प्रशासनासमोर आहे. चारा छावणीचालकांच्या साखळीचा मलिदाही दूरपर्यंत पोचत असल्याने सर्वच मूग गिळून गप्प आहेत. 

२११ कोटींचा निधी  तालुक्‍यांना वर्ग
चारा छावणीचालकांना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झालेला २११ कोटी रुपयांचा निधी तालुक्‍यांना वर्ग करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील देयके छावणीचालकांना भेटली आहेत. पुढील देयके देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तालुकानिहाय कार्यरत चारा छावण्या व जनावरे
तालुका           छावण्या    जनावरे
बीड               १२४      १,०१,२२५
आष्टी              १८१       १,१३,११६
शिरूर               ५०        ३८,६२०
पाटोदा              ४६        २९,९९१
केज                 २६        १८,४६०
अंबाजोगाई         ०१        ६०८
वडवणी             ११        ६,६८६
गेवराई              ५२       ३६,७८३
धारूर               ०३      १,७०२
परळी                ०१       ३४४
माजलगाव     ०३    १,५७१
एकूण               ५४५      ३,४९,१०६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty eight fodder camps closed in beed district