मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊस

प्रतिनिधी
सोमवार, 24 जून 2019

 मराठवाड्यामध्ये रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत आठ जिल्ह्यांतील ७६ पैकी ५८ तालुक्यांमध्ये हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

औरंगाबाद, नांदेड - मराठवाड्यामध्ये रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत आठ जिल्ह्यांतील ७६ पैकी ५८ तालुक्यांमध्ये हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, फुलंब्री, वडोदबाजार, नागमठाण या चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. परंतु नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाचा जोर कमी होता. अनेक तालुक्यांत पावसाने दडी मारलेली आहे. या भागातील शेतकरी खरीप पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील उस्मानपुरा मंडळामध्ये ११०, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री मंडळामध्ये ११५, वडोदा बाजार मंडळामध्ये ११५, वैजापूर तालुक्यातील नागमठाण मंडळामध्ये ८२ मिमी पावसाची नोंद झाली. औरंगाबाद तालुक्यात सरासरी ३९, फुलंब्री तालुक्यात ८१.२५, पैठणमध्ये १५.६०, सिल्लोडमध्ये १६.३८, सोयगांव मध्ये १५, वैजापूरमध्ये २१.२०, गंगापूरमध्ये २४.५६, कन्नड तालुक्यात ८.६३, खुलताबादमध्ये २५.६७ मिमी पाऊस झाला.जालना जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात जोर कमी होता. जालना तालुक्यात सरासरी ११.८१, बदनापूरमध्ये १९, भोकरदनमध्ये ३५.३८, जाफ्राबादमध्ये १०.८०, परतूरमध्ये २.८०, मंठा तालुक्यात १३, अंबड तालुक्यात ५.४३., घनसावंगीमध्ये ४ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. अन्य तालुक्यांत रिमझिम पाऊस झाला. परभणी तालुक्यात सरासरी १.५, जिंतूरमध्ये २.८३ ,मानवत तालुक्यात ३, पाथरी तालुक्यात १, सोनपेठमध्ये २, गंगाखेडमध्ये १.२५, पालममध्ये ३, पूर्णा तालुक्यात ७.२० मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

कळमनुरी तालुक्यात सरासरी २.५०, सेनगावमध्ये ३.८३, औंढा नागनाथ तालुक्यात ३ मिमी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी ८ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. माहूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. कंधार तालुक्यात सरासरी ५.८३, लोहा तालुक्यात ६.२७, किनवट तालुक्यात ७.७१,  माहूर तालुक्यात २६, हदगावमध्ये १.८६, देगलूरमध्ये १.३३ मिमी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील १० पैकी ८ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. उदगीर तालुक्यात सरासरी ७.५७, अहमदपूरमध्ये ८, चाकूरमध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ तालुक्यांत पाऊस झाला. भूम, परंडा, वाशी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. उस्मानाबाद तालुक्यात सरासरी ४.८८, कळंबमध्ये ३.८३, भूम तालुक्यात २५.४०, कळंब तालुक्यात ३.८३, वाशीमध्ये ६.२७, परंडा तालुक्यात ९.४० मिमी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ७ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. पाटोदा, आष्टी तालुक्यात पावसाचा जोर होता. पाटोदा तालुक्यात सरासरी १८.५०, आष्टी तालुक्यात १६.१४, शिरूर कासार तालुक्यात २.३३ मिमी पाऊस झाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty eight talukas rain in Marathwada