
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे तब्बल आठ महिने बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद अत्यल्प होता.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे तब्बल आठ महिने बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद अत्यल्प होता. मात्र आठ दिवसानंतर चित्र बदलले आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती दहा टक्क्यांहुन पन्नास टक्क्यांपर्यंत आली आहे. दरम्यान ग्रामीण भागातून उमरगा शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे. मात्र खासगी शाळांनी पटसंख्या टिकवण्यासाठी पदरमोड करून विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची केलेली सोय तूर्त बंद आहे.
त्यामुळे शिवाय यापेक्षा पालकांकडून संमतीपत्र देण्यासाठी नकारात्मक मानसिकतेमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे. उमरगा शहर व तालुक्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाची संख्या ६७ आहे त्यापैकी ६३ शाळा सुरू झाल्या आहेत. एकुण सोळा हजार ३८० विद्यार्थी संख्येपैकी शाळेच्या पहिल्या दिवशी एक हजार ६७१ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. उमरगा शहरात सात हजार, तर मुरूम शहरातील दोन हजार ८२४ विद्यार्थी संख्या आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसांत बराच फरक पडला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील शाळेत एकुण पटसंख्येच्या जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसत आहे. मात्र ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्क्यांपर्यंत पण ....
शाळा सुरु झाल्यापासुन विद्यार्थ्यांना हात धुण्याची सोय, ऑक्सिमीटरने तपासणी आणि मास्क व सॅनिटायझर व पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र बॉटल अशा नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. हळूहळू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. एकुण सोळा हजार ३८० विद्यार्थी संख्येपैकी गेल्या दोन दिवसांत सात हजार ३८० विद्यार्थी अध्ययनासाठी हजर होते. उमरगा व मुरुम शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळानी मोफत स्कुल बसची सोय सुरू केलेली आहे. मात्र सध्या बस बंद आहे. ग्रामीण भागातील पालकांनी शहरातील शाळा, महाविद्यालयात पाठविण्यासाठी संमतीपत्र देण्याविषयी धरसोड करत आहेत. त्यामुळेही पटसंख्या वाढत नाही.
कोरोनाच्या स्थितीमुळे सर्व नियमावलीचे पालन करुन नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आठ दिवसानंतर विद्यार्थी संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात उपस्थितीचे चित्र आहे. मात्र शहरात प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी ग्रामीण भागातील पालकात निरुत्साह आहे. शाळा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याने विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी सकारात्मक मानसिकता असायला हवी. येणाऱ्या काही दिवसांत विद्यार्थी संख्या आणखीन वाढेल.
- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी
संपादन - गणेश पिटेकर