कोरोनाचा परिणाम ः पुण्या, मुंबईच्या पाहुण्यांनी गाठला पन्नास हजारांचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

राज्य सरकारने राज्यात संचारबंदी जाहीर करताना जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. मात्र, पळवाटेने पुणे व मुंबई येथील नागरिकांचे आगमन जिल्ह्यात सुरू असून ओसाड पडलेल्या रस्त्यांवर केवळ पुणे व मुंबईच्या चारचाकी व दुचाकी धावत आहेत. यातूनच जिल्ह्यात मंगळवारी (ता.२४) रात्रीपर्यंत पुणे व मुंबई येथील ५३ हजार ८२ पाहुण्यांचे आगमन झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.   

लातूर : राज्य सरकारने राज्यात संचारबंदी जाहीर करताना जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. मात्र, पळवाटेने पुणे व मुंबई येथील नागरिकांचे आगमन जिल्ह्यात सुरू असून ओसाड पडलेल्या रस्त्यांवर केवळ पुणे व मुंबईच्या चारचाकी व दुचाकी धावत आहेत. यातूनच जिल्ह्यात मंगळवारी (ता.२४) रात्रीपर्यंत पुणे व मुंबई येथील ५३ हजार ८२ पाहुण्यांचे आगमन झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.   

पुणे व मुंबई येथून येणाऱ्या पाहुण्यांची ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. शहरांतून कोणी नातेवाईक आला की त्याची विचारपूस नागरिक करित आहेत. त्यांच्यापासून चारहात दूर राहणेच पसंत करत आहे. पुणे व मुंबईहून कोणाच्या घरी आलेल्या पाहुण्यांची माहिती काही क्षणात गावभर होत आहे. यामुळे पाहुणे आलेल्या घरी ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून विचारणा होत आहे. पाहुणे आलेली माहिती आरोग्य विभागाला देण्यासाठी नागरिक तत्पर झाले असून या पाहुण्यांनी रूग्णालयात जाऊन तपासणी करावी, यासाठी त्यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणला जात आहे. पुणे व मुंबईहून आलेल्यांना `केव्हा आलात?` असा प्रश्न विचारून निरखून पाहिले जात आहे. ग्रामीण भागात तर पुणे व मुंबईच्या पाहुणे नकोशे झाले आहेत.

वाचा ः  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लातूरला चांगली बातमी, `त्या` महिलेसह लातूरचे सर्व...

संचारबंदी लागू होऊन जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एवढी बिकट स्थिती असतानाही पुणे व मुंबईहून नागरिकांचे आगमन सुरूच आहे. हा लोंढा कमी होण्याची प्रतीक्षा आरोग्य यंत्रणेला आहे. या स्थितीत जिल्ह्यात मंगळवारपर्यंत पुणे व मुंबईहून ५३ हजार ८२ नागरिकांचे आगमन झाले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. लोक जागरूक झाल्यामुळे पुणे व मुंबईहून आलेल्यांची खडा न् खडा माहिती प्रशासनाला होत आहे. यामुळे पाहुण्यांवर गावची आणि प्रशासनाची पाळत वाढत असली तरी दररोज नव्याने दाखल होणाऱ्या पाहुण्यांमुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty Thousand Guest Come From Pune, Mumbai To Latur District, Latur