esakal | उस्मानाबाद-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम कधी मार्गी लागणार?
sakal

बोलून बातमी शोधा

rail

उस्मानाबाद-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम कधी मार्गी लागणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: केंद्र सरकारने उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या कामाचे वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाचे भूमिपजून केले होते. मात्र, त्यासाठी अद्याप निधीच मिळाला नाही. त्यामुळे काम रखडले आहे. उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या ८० किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी ९५३ कोटी रुपयांची गरज आहे. रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची राज्य व केंद्र या दोन्ही सरकारची जबाबदारी आहे. मार्गावरील सात स्थानके व अंदाजे ३२७ हेक्‍टर एवढ्या जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, राज्य सरकार केंद्राकडे व केंद्र राज्याकडे बोट दाखवीत असल्याने हा मार्ग रखडला आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शुभकार्य करावसे वाटते. पण, त्याच तुळजापूरला निधी द्यायची वेळ आली की, कोणतेही सरकार पुढाकार घेत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले हे गाव अजूनही रेल्वेच्या नकाशावर आलेले नाही. निधीसाठी दोन्ही सरकारकडून दिशाभूल करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: हिंगोलीत शेतकऱ्याने लावली शेतात गांजाची झाडे; शेतकरी ताब्यात

रावसाहेब दानवे यांच्याकडून अपेक्षा
नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठवाड्याचे रावसाहेब दानवे यांना रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले. त्यांना या रेल्वेमार्गाची मागणी ठाऊक आहे. त्यामुळे राजकारण न करता दोन्ही सरकारच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यासाठी श्री. दानवे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: औरंगाबाद महापालिकेला तीन महिन्यात तब्बल ७० कोटींचा फटका!

जनतेनेही करावा दबावगट
या रेल्वेमार्गासाठी आता जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी दबाव करून त्यांना पाठपुरावा करण्यास भाग पाडावे. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणारा आहे. त्यामुळे उद्योगापासून दूर असलेल्या भागामध्ये नवीन उद्योग येण्याचाही मार्ग यामुळे सुकर होणार आहे. याशिवाय तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना सोलापूर मार्गे तुळजापूरला येणे अत्यंत सोयीचे ठरणार आहे.

loading image