लातूरात चित्रपट महोत्सव; डॉ. मोहन आगाशे, सुमित्रा भावे साधणार प्रेक्षकांशी संवाद

सुशांत सांगवे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

 राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात चमकलेला आणि सुवर्णकमळ पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलेला कासव, म्हातारपणातील आजारावर आधारित अस्तू, पालकांनी साथ दिली तर विशेष मुले कुठंवर झेप घेऊ शकतात हे दाखवून देणारा येलो... असे एकाहून एक सुंदर आणि वेगळा विचार करायला लावणारे चित्रपट लातुरातील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. शिवाय, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे अशा दिग्गजांशी या चित्रपटांवर संवादही साधता येणार आहे. 

लातूर : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात चमकलेला आणि सुवर्णकमळ पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलेला कासव, म्हातारपणातील आजारावर आधारित अस्तू, पालकांनी साथ दिली तर विशेष मुले कुठंवर झेप घेऊ शकतात हे दाखवून देणारा येलो... असे एकाहून एक सुंदर आणि वेगळा विचार करायला लावणारे चित्रपट लातुरातील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. शिवाय, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे अशा दिग्गजांशी या चित्रपटांवर संवादही साधता येणार आहे. 

ही अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे सोसायटी फॉर वेलबिईंग अवेअरनेस ऍण्ड रिहॅबिलिटेशन (स्वर), अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि अभिजात फिल्म सोसायटीने. स्वर संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने मानसरंग चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून तो 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या कालावधीत दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असणार आहे. याबाबतची घोषणा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. 

प्रेरणादायी चित्रपटांचे होणार सादरीकरण
निराशेच्या अंधारातून आशेच्या प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या कासव या चित्रपटाच्या सादरिकरणाने महोत्सवास सुरवात होईल. हा चित्रपट 30 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सादर होईल. त्यानंतर सुमित्रा भावे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. याच दिवशी दुपारी तीन वाजता अस्तू हा चित्रपट दाखवला जाईल. चित्रपट संपल्यानंतर डॉ. आगाशे चित्रपटावर आपले मनोगत मांडणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (ता. 1) अमृता सुभाष यांची प्रमुख भूमिका असलेला बाधा आणि त्यानंतर रितेश देशमुख निर्मित यलो हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये व त्यातील कलावंत गौरी गाडगीळ प्रेक्षकांशी संवाद साधतील. 

या चित्रपट महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असला तरी नोंदणी करून मोफत प्रवेशिका घेणे बंधनकारक आहे. सावली सेंटर ऑफ मेंटल हेल्थ, दयानंद महाविद्यालयासमोरील श्री न्यूरोकेअर, देशिकेंद्र विद्यालयाशेजारील पोद्दार हॉस्पिटल, बस स्थानकासमोरील संतुलन मानसोपचार केंद्र, औसा रस्त्यावरील संजय क्वालिटी, तापडिया मार्केटमधील फायब्रोप्लास्ट या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सामाजिक दृष्टीकोन समोर ठेऊन आणि मानसिक आरोग्य हा विषय चर्चेला यावा म्हणून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे डॉ. पोतदार यांनी सांगितले. या वेळी डॉ. अशोक आरदवाड, डॉ. मुग्धा पोतदार, जितेंद्र पाटील, अभिजात फिल्म सोसायटीचे सचिव श्‍याम जैन उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film festival in latur