औरंगाबाद ः शहराच्या पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद, -  शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) अंतिम सादरीकरण सोमवारी (ता. नऊ) महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबईत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या समोर सादरीकरण केले. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेला मंजुरी घेतली जाईल, असे राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

समांतर पाणीपुरवठा योजनेत तडजोड अशक्‍य असल्याचे समोर येताच प्रशासनाने या योजनेला मूठमाती देण्याचा निर्णय घेत नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार महापालिकेने पाणीपुरवठ्याचा डीपीआर इनोव्हेशन सोल्युशन्स या एजन्सीमार्फत तयार करून घेतला. या डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर तीन ऑगस्टला डीपीआर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. यासंदर्भात सोमवारी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती. यावेळी जीवन प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. बैठकीत डीपीआरचे अंतिम सादरीकरण करण्यात आले. आगामी दोन दिवसांत 1,680 कोटी 50 लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळेल, असे, सुत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांना भेटणार ः सावे 
सोमवारी महापौरांसह महापालिका पदाधिकारी मुंबईच होते. डीपीआरच्या सादरीकरणानंतर आता मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, योजनेला मंत्रिमंडळासमोर नेण्याची आवश्‍यकता नाही. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची सही घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर निविदा प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com