परळी केंद्रातून अखेर वीज निर्मिती सुरु, तिन्ही संच कार्यान्वित

प्रविण फुटके
Wednesday, 7 October 2020

परळी वैजनाथ येथील महा औष्णिक वीज निर्मिती केंद्र मंगळवारपासून (ता.६) सुरु झाले आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील महा औष्णिक वीज निर्मिती केंद्र मंगळवारपासून (ता.६) सुरु झाले आहे. वीजनिर्मिती आतातरी कायमस्वरूपी सुरू राहावी, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात सर्वात जास्त रोजगार देणारा हा एकमेव वीज निर्मिती प्रकल्प आहे. हजारावर जणांना रोजगार मिळतो. केंद्र सुरू असले बाजारपेठेलाही चालना मिळते.

पण, कधी कोळसा, पाणी नाही किंवा मागणी नाही, परवडत नाही आदी वेगवेगळी कारणे देत सातत्याने हे केंद्र बंद केले जाते. त्याचा परिणाम कामगारांसह परळीच्या अर्थकारणावर होतो. हे केंद्र सुरळीत सुरु व्हावे, यासाठी ‘सकाळ' ने पाठपुरावा केला होता. आता ते सुरु झाल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली मंदी काहीशी दूर होण्यास मदत होणार आहे.

जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव

७५० मेगावॅट वीज निर्मिती
गेल्या एप्रिलपासून हे केंद्र बंद होते. प्रत्येकी २५० मेगावॅट क्षमतेच्या तीन संचांद्वारे ७५० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. सध्या वीजेची मागणी वाढल्याने हे तिन्ही संच सुरू करण्यात आले आहेत.

पाण्याचा प्रश्न सुटला
केंद्राला पाणीपुरवठा करणारा खडका येथील बंधारा तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न येणार नाही. अन्य केंद्रांच्या तुलनेत येथील वीज महाग पडते, असे कारण दिले जाते. त्याची प्रशासनाने काळजी घेऊन अन्य काही खर्च कमी करुन वीज निर्मीतीवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Electricity Production Starts In Parli Thermal Power Station Beed News